
पहिला पाऊस सर्वांना वाट बघायला लावणारा, मानवी मनाला ओलावा देणारा, संपूर्ण सृष्टीत चराचरात चैतन्य आणणारा, ओठांवर नकळत हास्य फुलवणारा, जुन्या आठवणींना उजाळा देणारा........ 'पहिला पाऊस'. निसर्ग नियमाप्रमाणे ऋतू बदलतो. चार महिन्यांच्या उन्हाने तप्त झालेली जमीन पावसाची तन्मयतेने वाट बघत असते. पहिला पाऊस येतो अन रोखलेला श्वास मोकळा होतो. वर आकाशाकडे पाहणारे डोळे सुद्धा तृप्त होतात. सर्व सामान्य माणसालाही पावसावर कविता करावीशी वाटते. पाऊस आला कि वाटते परत एकदा लहान व्हावं.............

ये शोहरत भी लेलो, ये दौलत भी लेलो ,
भले छीनलो मुझसे मेरी जवानी,
मगर मुझको लौटा दो ,
वो कागज कि कश्ती, वो बारीश का पानी........!!!

बालपणीच्या आठवणी मध्ये मन गुंतून जाते. पावसाची सुरवात व्हायच्या आधीच पावसाची गाणी सुरु होतात. हा पाऊसही लहान मुलासारखा निरागस असतो. तो कधीच भेदभाव करत नाही. शाळेतून घरी परतताना मध्येच पावसाने गाठलं तरी, एखाद्या झाडाखाली उभं न राहता त्या पावसाच्या सरीमध्ये भिजत घरापर्यंत चिखल तुडवत जायला खूप मजा येते घरी आल्यावर आईचा मार खावा लागतो, पण चिंब भिजल्याने जो आनंद मिळतो त्यापुढे आईचा मार काहीच वाटत नाही. बाई वर्गात शिकवत असतात आणि आपण त्याच्या येण्याची वाट बघत असतो. एकदा तो आला मग काय मजाच मजा वर्गात फक्त दंगा करायचा. शिकवणीला सुट्टी म्हणूनच पाऊस आणि बालपण याचं अगदी जीवाभावाच नातं असतं.

कधी हा पाऊस नाजूक, हलक्या तुषार प्रमाणे मोह लावणारा असतो. पहिला पाउस पडल्यावर मातीचा जो गंध येतो त्याची सर दुसऱ्या कशाला कशी येणार ? ते काळेनिळे आकाश खूप दिवसा नंतर गडगडून एकमेकांना भेटणारे ढग, लख्ख चमकणाऱ्या विजांचा कडकडाट सगळीकडे मंगलमय वातावरणाचा भास होतो. धरती आकाशाच्या मिलनाला स र्व चराचर साक्षी असतात आणि त्यावेळी वाटत स्वर्गाची जी कल्पना केली जाते ती यापेक्षा वेगळी काय असणार ? पानांवर त्यावेळी थबकलेले पावसाचे थेंब बघून वाटते जणू मोत्याचा सडाच शिंपलाय कोणी आनंदाने भरभरून .....!

पाऊस आणि मस्तपैकी गरम गरम चहा आहाहाss दुपारच्या वेळेस हलका हलका पाऊस सुरु असताना खिडकी जवळ बसून किंवा पोर्चमध्ये खुर्चीत बसून एकसारखा पडणारा पाऊस पहायलाही खूप मजा येते.

पावसाच्या पाण्याचे डबक्यात पडणारे थेंब मग त्यातून निर्माण होणारी असंख्य वर्तुळ हवेतील छान गारवा ...... मग बाहेर हात काढून आपणही काही थेंब हातामध्ये झेलायचे. सोबत सुरेश भट किंवा जगजीत सिंगची गझल. एका हाती चहाचा कप आणि मदभरा आवाज मग काय ऐश. असंच चहाचा एक एक घोट घेत पावसाला बघत राहायचं त्या क्षणी त्या चहाची लज्जत काही औरच असते. एक वेगळीच नशा त्या चहाने चढते.

काही लोक पाऊस पडत असताना दार खिडक्या लावून झोपून राहतात. पावसात ती हि कोणा कोणाची आवड असते. पण प्रत्येक जण आपापल्या परीने पावसाचा आनंद लुटत असतो. कोणाला चिखलाचा, पावसाचा रागही येत असेल. कपड्यांवर शिंतोडे उडू नयेत म्हणून जपून चालनारेही असतात. पण आपल्याला काय त्याचं ?
हा पाऊस अनेक आठवणींना उजाळा देतो. कॉलेजची सुरवात, अडमिशन, नवीन मित्र मैत्रिणी, नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध, पावसात क्लासमध्येच गाण्याच्या भेंड्या, चहा - भज्यांची पार्टी.................
हा पाऊस अनेक आठवणींना उजाळा देतो. कॉलेजची सुरवात, अडमिशन, नवीन मित्र मैत्रिणी, नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध, पावसात क्लासमध्येच गाण्याच्या भेंड्या, चहा - भज्यांची पार्टी.................

कितीतरी गोष्टी आठवायला लागतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पावसात ओल होताना त्या एकाच छत्रीची आठवण येते . 'तो' आणि 'ती' पावसाच्या निमित्ताने तरी एकमेकांशी बोलतात. त्यांच्यासाठी 'गोल्डन चान्सच' तो. घाबरलेली ती, भिरभिरणारी नजर, थरथरणारे ओठ, केसांच्या ओल्या बटा आणि तो स्वतः ओला होतो, पण त्याची छत्री तिच्या डोईवर धरतो. हे क्षण पुढे जन्मभर पुरतात.

पावसळ्यातला प्रत्येक दिवस एक उत्सव होऊन येतो. मनाला मोहविणारा अंगावर शहरा आणणारा हाच पाऊस वेडही लावतो. आपल्या सारखीच पाखरंही घरट्यात बसून पावसाची गंमत बघत असतात. पक्षिणी आपल्या पिल्लांना पंखाखाली झाकून घेते. इवल्या इवल्या चोचीने त्यांना दाना भरवते.
हा पाऊस हसवतो, तर कोणाला रडवतो, शेतकऱ्यांच जीवन तर त्याच्यावरच अवलंबून असतं.

काहीही म्हणा या पावसात चिंब भिजल्याने वर्षभराचा तान, थकवा दूर होतो आणि एक वेगळाच आनंद मिळतो. आता पाऊस सुरु झालाय, ओठांवर कुठल्या न कुठल्या गाण्याच्या ओळीही खेळताहेत. गा आता,............. 'टिप टिप बारिश शुरू हो गई ................!!!