22 Feb 2018

मैत्रीणीस पत्र

प्रिय सरु ,
पत्रास कारण की......... .. क्षणांनी बनतं आयुष्य, प्रत्येक क्षण वेचत रहा...... क्षणी आनंदाच्या उमलत रहा....... असतात क्षण दुःखाचेही समर्थ पणे पेलावेस तेही....... हार असो वा जीत हर्ष असू देत सदैव मनी ....... अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तू अशीच बहरत रहा....... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा............!!!

अनेक गोष्टी तुझ्याशी शेअर करायच्या होत्या पण घबघडाई च्या आयुष्यात आणि ऑफीस च्या कामात राहून जात, तसं व्हाट्स अँप वर रोजच बोलतो आपण पण त्यात तो आपले पणा कधीच मिळत नाही जो आपल्याला हवा असतो.आपल्याला एकमेकींच्या आयुष्यात येऊन किती वर्ष झाली ते आता सांगता येणं कठीण आहे, सातवी पर्यंत आपण  एका वर्गात असून आपल्यात कधी संवाद झालाच नाही तेव्हा आपण एकमेकींच्या आयुष्यात असून नसल्या सारख्या होतो, नंतर टेकनिकल मुळे आपल्यात थोडी मैत्री झाली, पुढे कॉलेज ला गेल्यावर थोडी जास्त झाली आणि आपण कधी एकमेकींच्या जिवलग झालो ते कळलच नाही.

त्यादिवशी प्रांजलला मी कृष्ण आणि सुदामाचा विडिओ दाखवत असताना तिने मला माझ्या खास मैत्रिणी बद्दल विचारलं आणि नकळत माझ्या तोंडून तुझं नाव बाहेर पडलं...तेव्हा मी स्वतःला एक प्रश्न विचारला खरंच आपण जिवलग आहोत ? त्याच उत्तर शोधताना माझ्या लक्षात आलं -
बऱ्याचदा असं होत मला वाटतं असतं तुला फोन करावा आज करू उद्या करू पण कामाच्या गडबडीत होतच नाही आणि अचानक तुझा फोन येतो किंवा मग तुला माझी आठवण येत असते आणि मी तुला फोन करते यावरूनच लक्षात येत कि आपल्या मनाचे तार किती जोडल्या गेलेत एकमेकींशी. आपण फोन करतो एकमेकींना तासंतास फोनवर गप्पा मारतो विषय असताना आणि विषय नसताना पण,खूप गोष्टी असतात आपल्याकडे  बोलायला कधी नवऱ्याचा लाड  तर कधी नवऱ्याचा राग..... , कधी बहिणींचे हेवेदावे तर कधी जावांचे......., कधी मुलांचा अभ्यास तर कधी मुलांचं भविष्य...... , कधी नोकरीतल्या अडचणी तर कधी मैत्रिणींचे संसार......, कधी फिरण्याची मजा तर कधी रुसण्याची.........  बरंच काही जे आता आठवत नाही. बऱ्याचदा आपल्याला एकमेकींचा राग येतो, हसू येतं,कधी हेवा ही वाटतो पण हे सगळं क्षणिक असत, तुझ्याशी बोलताना मला कधीच विचार करून बोलावं लागत नाही किंवा हे कळलं तर  ती काय म्हणेल, तिला काय वाटेल, ती माझ्या विषयी काय विचार करेल काहीच नाही फक्त बोलायचं मन मोकळं होई पर्यंत बोलायचं...तुला माझ्या विषयी काय वाटत हे मी विचारणार नाही पण माझ्या लेखी तू माझी जिवलग आहेस हे नक्की.  

सरु खरंतर माझ्या भाऊजींचे आणि तुझ्या भाऊजींचे पण आपण आभार मानायला पाहिजेत त्यांनी आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच आज आपली मैत्री बहरलीये...

जीवघेणी स्पर्धा, कठीण क्षण.... , चोहीकडे गर्दी आणि त्रासलेले मन......,खुपसाऱ्या अपेक्षा आणि ओझं........ तारेवरची कसरत त्या पूर्ण करण्यासाठी....... , प्रत्येक वाटेवर खाचखळगे आयुष्य सुखाने जगण्यासाठी......., आयुष्यातली प्रत्येक वाट अशीच कधी वळणावळणाची, कधी त्रासाची तर कधी त्यागाची........,  मी तुझ्यासाठी यातले काहीच करू शकणार नाही बहुदा........, पण एक मात्र नक्की करीन........,  आठवण ठेवीन तुझ्या सोबतीची आणि त्या क्षणांची अन मोकळी ठेवीन........... मोकळी ठेवीन वाट मी माझ्या मनाची ......... 


                                                                                                                               
                                                                                                                                          - तुझीच 

No comments:

Post a Comment