11 Oct 2025

माझिया प्रियाला प्रीत कळेना....💞 भाग ४

 संध्याकाळी सराव संपतो. सगळे निघून गेलेले असतात. शरयू तिचा ढोल गुंडाळत असते.

पाठीमागून समरचा आवाज –
“ओ ठाले पाटील, आज भारी वाजवलंत
तुम्ही.”

ती वळते. समोर समर उभा असतोत्यानं क्रीम कलरचा  शर्ट , बाह्या गुंडाळलेल्या, घामाच्या थेंबांनी चेहरा चमकत होता. तो दिसताच तिचं हृदय वेगानं धडधडू लागतं.

ती गडबडून म्हणते – “अ… हो. धन्यवाद सर.”

समर हलकं स्मित करत शांतपणे म्हणाला – “एक विचारू ?

ती –  हम्म.... 

“सगळे मला ‘समर भैया’ म्हणतात. पण तु एकटीच मला ‘समर सर’ म्हणते असं  का?”

शरयू दचकली.  ती नजर चुकवत म्हणाली –

“तसं काही नाही सर… फक्त… सवय झालीये.”

तो हळूच हसला.

“सवयी बदलतात ठाले पाटील… पण काही नाती मात्र मनात खोल रुजतात.”

शरयू काहीच बोलली नाही…..फक्त तिचं हृदय धडधडत होतं.

त्याला जाणवलं होतं – प्रेमाचा ठोका आता जवळ येतोय.

त्या क्षणी त्याच्या डोळ्यांतलं ऊबदार हसू तिला वेडं करून टाकतं.

---

गावातल्या गणेशोत्सवाची तयारी सुरू होती.
ढोलताशांचा सराव आता आणखी जोरदार चालू होता.
समरला यावर्षीचा ग्राउंड परफॉर्मन्स कुठेही कमी पडायला नको होता.

तो सगळ्यांवर कठोर नजरेने लक्ष ठेवत होता.
पण प्रतापने त्याला सांगितलं –
“दादा, या वर्षीच्या मुख्य तुक
डीचं नेतृत्त्व शरयूला देऊया का? तिचं टायमिंग आता चांगलं जमतंय.”

क्षणभर समर थांबला.
त्याच्या नजरेत शंका होती.
“ही? अजून कच्ची आहे… मोठ्या परफॉर्मन्सला सांभाळेल का?”

प्रताप हसला –
“कच्ची आहे म्हणूनच संधी देऊ. तू बघशील तर ती जमवेल.”

समर बाहेरून कठोरपणे मान हलवत म्हणाला –
“ठीक आहे. पण जर गडबड झाली तर जबाबदारी तुझी.”

---

त्या संध्याकाळी मैदानावर सराव जोरात सुरू होता.
शरयूला मुख्य ताल पकडायचं काम दिलं गेलं.
सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या.
तिच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता, हात थोडे थरथरत होते.

समरने ते पाहिलं.
तो शांतपणे तिच्या जवळ आला.
हळू आवाजात म्हणाला –
“घाबरू नकोस. तुझं लक्ष फक्त ढोलावर ठेव. बाकीचं मी बघतो.”

पहिल्यांदाच त्याचा आवाज एवढा मऊ होता.
शरयू क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली.
तिच्या मनातली भीती जरा कमी झाली.

तिने ठेका सुरू केला – दमदुम! दमदुम!
सगळ्यांचा ताल तिच्याशी जुळला.
मैदान ढोलाच्या गजराने दणाणून गेलं.

टाळ्यांचा कडकडाट झाला.
परफॉर्मन्स संपल्यावर प्रताप धावत आला –
“वा शरयू! भारीच झालं!”

शरयू हसली, पण तिच्या नजर थेट समरकडे गेली.
तो शांत उभा होता, चेहऱ्यावर नेहमीसारखी कडक नजर.

समरने फक्त डोळ्यांनीच होकार दिला.
त्या एका नजरेने शरयूच्या मनातलं सगळं दडपण नाहीसं झालं.

---

पण घरी चित्र वेगळं होतं.
त्या रात्री जेवताना आईने विचारलं –
“शरयू, उशीर का होतोय रोज? ढोल-ताशाचं छान आहे, पण कॉलेजचा अभ्यास मागे पडला तर चालणार नाही.”

बाबांनीही जोड दिली –
“आता शेवटचं वर्ष आहे तुझं. भविष्यासाठी विचार करायला हवा.”

शरयूचं मन कसंच झालं.
ढोल तिचं स्वप्न होतं, पण आई-बाबांचं म्हणणंही चुकीचं नव्हतं.

ती हलक्या आवाजात म्हणाली –
“अगं आई, मी सगळं सांभाळेन. फक्त थोडा वेळ द्या ना…”

आईने न बोलता मान हलवली, पण तिच्या चेहऱ्यावरची चिंता शरयूला स्पष्ट दिसली.

---

दुसऱ्या दिवशी मैदानावर शरयू आली खरी, पण तिच्या चेहऱ्यावरची चमक कुठेतरी हरवलेली होती.
ढोल हातात घेतानाही तिच्या बोटांत ती नेहमीची उत्सुकता नव्हती.

समरने ते पहिल्याच ठोक्यात ओळखलं.
सराव संपल्यावर तो तिच्या जवळ गेला.

“काय झालं?” त्याचा आवाज नेहमीसारखा कठोर नव्हता, मृदू होता.
“आज तालात जोश नाही.”

शरयू थोडा वेळ काही बोलली नाही.
नजरा खाली करून ती हळू आवाजात म्हणाली –
“घरी सगळ्यांना माझा उशीर आवडत नाही…
‘अभ्यास, भविष्य – सगळं मागे पडेल’ म्हणतात.
त्यांचा राग मला समजतो… पण माझं मन इथेच अडलंय ढोलात.
काय करू, तेच कळत नाही.”

तिच्या डोळ्यांतली अस्वस्थता पाहून समर काही क्षण शांत राहिला.
नंतर त्याने हलकेच तिच्या हातातून चाटी डंका घेतला, तिच्याकडे पाहत म्हणाला –

“ज्याच्यावर खरं प्रेम असतं, त्यासाठी लढावं लागतं.
मग ते स्वप्न असो… किंवा नातं.”

शरयू दचकली.
तो शब्द जणू तिच्या मनातल्या अगदी खोल भावनांना स्पर्शून गेले.
ती काही बोलू शकली नाही, पण तिच्या डोळ्यांत नकळत चमक उमटली.

समरच्या नजरेत एक वेगळीच ऊब होती,
जणू त्याने तिचं मन न सांगता वाचलं होतं.
आणि त्या क्षणी शरयूला जाणवलं –
ढोलाच्या तालासारखंच, तिचं हृदयही आता त्याच्याशी बांधलं गेलंय.

----

सकाळ झाली, शरयूची घरी तयारी सुरू होती.
आई-बाबा अजूनही ढोलासाठी वेळ देण्याबाबत थोडे चिंताग्रस्त होते, पण शरयूचं आत्मविश्वास पाहून बोलण्याची ताकद कमालीची होती.

शरयू मैदानावर पोहोचली आणि ढोल पकडताच तिच्या मनात हलकी उब आली.
तीने पाहिलं – समर बाजूला शांतपणे उभा होता.
त्याच्या कडक नजरेत अजूनही तीच काळजी आणि लक्ष जाणवत होते, पण आतून ती एक हलकी मृदुता अनुभवली.

सराव सुरू झाला.

समरने आज तिला थोड्या वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलं.
“तु
झा हात हलकासा पुढे ठेव. ताल सांभाळ, बाकी मी बघतो.”

शरयू हळूहळू ताल पकडत गेली.
ढोलाचा ठेका नेमका बसत गेला आणि समरचा कठोर चेहरा हळूहळू हसण्याकडे वळला.
त्याने विचार केला –
“हा खेळ, हा ताल, हा तिचा आत्मविश्वास… सगळं खूप खास आहे.”

---

सराव संपल्यावर शरयूने शांतपणे समरकडे पाहिलं.
“माझं मन आधीच ढोलात अडकलेलं आहे, पण तुमच्या मार्गदर्शनाने सगळं सोपं झालं,” ती म्हणाली.

समरच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं.
“तुझ्या मेहनतीचीच फळं आहेत. मी फक्त मार्गदर्शन करतोय. बाकी सगळं तुझ्या हातात आहे.”

त्या क्षणाला दोघांच्या मनात एक छोटा पण ठळक बदल झाला –
गैरसमज मिटले होते, आणि नकळत जवळीक आणि विश्वास वाढले होते.

---

सराव जोरात सुरू होता.
ताल दणाणून मैदानात घुमत होते.

अचानक समरचा हात ढोलाच्या कठीण कडेवर आपटला.
क्षणभर तो भुवया मिटून थांबला, पण लगेच काहीच झालं नाही अशा थाटात ढोल वाजवत राहिला.

शरयूने ते पाहिलं. तिचं मन चुळबुळू लागलं.
“सर… हात दाखवा.”

“नको, काही नाही झालं,” तो सहज म्हणाला.

शरयूने भुवया उंचावत पुन्हा मागणी केली,
“दाखवा ना! तुम्हाला काही झालं तर…”

ती त्याच्या जवळ सरकली.
समर नकार देत असतानाच शरयूने त्याचा हात हलकेच धरला.
तिच्या नाजूक बोटांत त्याचा कठोर हात बंदिस्त झाला.

लालसर झालेली त्वचा पाहताच तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं.
“इतकं दुखतंय… तरी तुम्ही लपवता का? स्वतःची काळजी नाही का तुम्हाला?”

समर तिच्या डोळ्यांत बघत स्थिर झाला.
त्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं.
तो हळू आवाजात म्हणाला –

“असं म्हणालात तर खरंच दुखू लागतं.”

शरयूच्या ओठांवर शब्द अडकले.
हृदयाची धडधड तिच्याच कानांना ऐकू येत होती.
ती नजरेला नजर देऊ शकली नाही.

समरने आपला हात तिच्या घट्ट पकडलेल्या बोटांतून हलकेच सोडवला,
पण त्या स्पर्शाचा ठसा दोघांच्या मनावर कायमचा उमटून गेला.


- @ सौ. रोहिणी माने



माझिया प्रियाला प्रीत कळेना.... 💞 भाग ५



No comments:

Post a Comment