सूर्यकिरणांनी हॉल उजळला होता. स्वयंपाकघरात वंदना ताईंच्या हातच्या चहाचा सुवास दरवळत होता — वंदना ताईं म्हणजेच समर आणि प्रतापची आई.
डायनिंग टेबलवर प्रताप आधीच बसलेला. समोर मोबाईलवर रील्स स्क्रोल करत स्वतःशीच हसत होता.
धैर्यशीलराव — म्हणजे दोघांचे वडील — पेपरमध्ये गुंतलेले, आणि सुमतीबाई — घरातल सगळ्यांत गमतीदार व्यक्तिमत्व , समर आणि प्रताप ची आजी — त्यांच्या नेहमीच्या “डबड्या” रेडिओवर जुनं मराठी गाणं ऐकत होत्या.
तेवढ्यात जिन्यातून शर्टाच्या बाह्या फोल्ड करत समर खाली आला. अंगावर हलका सुगंधी परफ्युम, केस थोडे अस्ताव्यस्त, पण नेहमीसारखाच तो आत्मविश्वास. खूपच राजबिंडा दिसत होता.
“आई, काय झालंय ? नाश्ता तयार नाही का? पटकन दे, जायचं आहे मला — अर्जंट मिटिंग आहे!”
वंदनाताईंनी गॅसवरचं झाकण उचलत हसत उत्तर दिलं,
“हो, आलेच ! तू बस आधी, एवढा कडमडतोस काय रोज सकाळी.”
समर हसतच हॉलमध्ये शिरला आणि थेट आजीकडे गेला.
“काय ग म्हातारे, काय ऐकतेस त्या डबड्यावर? अजून बंद पडला नाही का तो?”
सुमतीबाईंनी भुवया उंचावत -
“ऐ! डबडं काय म्हणतोस? हा माझा रेडिओ आहे, माझ्या लग्नात दिलेला माझ्या बाबांनी! अजून चालतो मस्तपैकी… तुझ्या त्या लॅपटॉपसारखा रोज हँग होत नाही!” 😏
क्षणभर शांतता… आणि मग सगळ्यांच्या तोंडून एकदम हशा फुटला.
प्रतापनं हसत म्हटलं,
“दादा, आजीची पंचलाइन भारी पडली!”
समर हसतच म्हणाला,
“बरं बरं. पण आता तो रेडिओ बंद करून नाश्ता करायला ये म्हातारे! नाहीतर नाश्ता संपेल !”
ते ऐकताच सुमतीबाई उठल्या, धैर्यशीलराव पेपर बाजूला ठेवून उठले आणि आजीचा हात धरत बोलले -
“चल आता, नाहीतर तुझ्या आवडीचा चहापण गार होईल.”
ते सगळे डायनिंग टेबलकडे आले.
वंदनाताईंनी सगळ्यांच्या प्लेटमध्ये पोहे वाढले — गरमागरम, बरोबर लिंबाचा तुकडा आणि वरून बारीक शेव.
पोहे समोर आले तसे समरचे तोंड आपोआप वाकडं झालं.
त्याचं लक्ष त्या पिवळ्या पोह्यांच्या ढिगाकडे गेलं पण लगेच त्याला आईची शिकवण आठवली —
“समोर आलेल्या अन्नाचा अपमान करायचा नाही.”
मग तो अनिच्छेने चमचा उचलून शांतपणे पोहे खाऊ लागला.
थोड्याच वेळात बाकीच्यांनी दुसऱ्या वेळेस वाढून घेतलं, पण समरच्या प्लेटमध्ये अजून अर्धे पोहे शिल्लक होते.
वंदनाताईंच्या नजरेतून ते सुटलं नाही.
“काय रे, आवडले नाही का पोहे?” त्यांनी विचारलं.
समरचा -
“आं… नाही, म्हणजे हो, चांगले आहेत…”
तेवढ्यात प्रतापला संधी मिळालीच, तो हसत म्हणाला,
“आई, तू पण आता किती दिवस त्याला तुझ्या हातचे पोहे खाऊ घालणार आहेस?
कंटाळा आला असेल दादाला तुझ्या हातचं खाऊन. आपण एक काम करू — दादाचं लग्न करू !”
लग्न शब्द ऐकताच समर ला ठसका लागला, त्याने प्रताप ला आईशी बोलायला सांगितलं होत पण तो असा सगळ्या समोर बोलेल असं वाटलं नव्हतं,
प्रताप लगेच पुढे बोलला,
“हो ना आई! वाहिनी आली की रोज नवीन पदार्थ मिळतील — कधी इडली, कधी डोसा, कधी वडा-सांबर… मग दादा पण खुश!”
समर राग आवरत - ,
“तुला काही काम नाहीये का आज?
प्रताप खोचकपणे मिश्कील हसत म्हणाला,
“अरे माझं कामच तर करतोय ना .... !”
वंदनाताई हलकं हसल्या,-
“अरे पण रोज इडली-डोसा बनवणारी मुलगी पाहिजे असेल तर आपल्याला साऊथमध्ये शोधायला लागेल बाळा!”
प्रतापने पटकन उत्तर दिलं,
“नाही नाही आई, आपल्याला फार दूर जायचं नाही. उपमा, थालीपीठ, शिरा पण चालतील… पण मुलगी इथलीच हवी. नाही का दादा?”
त्याच्या त्या शेवटच्या वाक्यानं तर समरच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला.
प्रत्येक घास आता घशात अडकत होता, आणि आई-बाबा हसत त्याच्याकडे पाहत होते.
समरने पटकन उठत सांगितलं,
“आई, मला उशीर होतोय, मी निघतो!”
तो खुर्ची मागे सारत बाहेर गेला — आणि मागे फक्त प्रतापचा आणि घरच्यांचा दाबलेला हसण्याचा आवाज येत राहिला.
----
समर ऑफिसला निघून गेल्यावर घरात पुन्हा रोजचं शांततेच वातावरण पसरलं.
धैर्यशीलराव स्टडी रूममध्ये गेले, हातात चष्मा, समोर पेपराऐवजी काहीतरी गंभीर पुस्तक.
आजीबाई त्यांचा जुना रेडिओ घेऊन रूममध्ये बसल्या — रेडिओवर पुन्हा तोच “जुना गाण्यांचा कार्यक्रम”.
वंदनाताईनी किचन आवरलं आणि हात पुसत थोडा विचार करत त्या थेट प्रतापच्या रूमकडे वळल्या.
दरवाजा अर्धवट उघडा होता.
आत प्रताप आरशासमोर उभा राहून केस विंचरत होता,
आरशात स्वतःकडेच बघून त्याने एक हलकी स्मितहास्याची रेष ओढली — “वा, मस्त दिसतोय मी!” असे काहीसे चेहऱ्यावर भाव.
वंदनाताई हसतच दार ठोठावतात.
“येऊ का रे?”
प्रताप लगेच आरशाकडून वळतो,
“आई, अगं ये ना, असं विचारतेस काय ?”
त्या आत येऊन थोडं इकडे तिकडे बघतात.
“घाईत आहेस का?”
प्रताप - “नाही गं, बोल ना, काय म्हणतेस?”
वंदनाताईंचा आवाज थोडा मंद झाला,
“काही नाही रे, थोडं बोलायचं होतं...”
प्रताप थोडा पुढे येऊन आईजवळ बसतो, तिचा हात हातात घेतो,
“बोल ना , एवढा काय विचार करतेस ?”
त्या हलकं स्मित करून म्हणतात,
“मघाशी तू जे समरच्या लग्नाचं बोललास ... खरंच सांग , त्याच्या मनात कुणी आहे का ?”
प्रतापच्या चेहऱ्यावर आता खट्याळ पण गोड भाव उमटले.
तो हसत म्हणाला,
“आई, तुला स्पष्ट सांगू का?”
प्रताप तिच्या डोळ्यांत बघत हळू आवाजात म्हणाला,
“आपल्या गणेश मंडळात एक मुलगी आहे... शरयू ठालेपाटील.
दादाला ती आवडते… आणि तिलाही दादा आवडतो.
आता पुढे काय करायचं, ते तू ठरव.
माझं काम झालं....!”
वंदनाताई थोडा वेळ स्तब्ध.
त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, पण ओठांवर एक हलकं हसू.
“अच्छा असं आहे तर... बरं, बघते मी आता.”
त्या वळून बाहेर निघतात.
प्रताप आरशात स्वतःकडे पाहत हसतो,
“दादा, तुझ्या प्रेमाची केस आता आईच्या कोर्टात गेलीये ... आता बघूया काय निकाल लागतो ते !” 😏
----
संध्याकाळचे साडेसहा वाजले होते.
सूर्याच्या शेवटच्या किरणांनी हॉलमधला पडदा सोनेरी रंगात न्हाऊन निघाला होता.
सुमतीबाई नेहमीप्रमाणे झुलत्या खुर्चीत बसून रेडिओवर “यादों का सफर” ऐकत होत्या, आणि धैर्यशीलराव मोबाईल बघत बसले होते.
तेवढ्यात वंदनाताई किचनमधून बाहेर आल्या, चहाचे तीन कप ट्रे मध्ये ठेवले आणि थोडं संकोचून बोलल्या —
“ऐका ना, थोडं बोलायचं होतं.”
धैर्यशीलरावनी मोबाईल बाजूला ठेवला,
“काय झालं? चेहऱ्यावर एवढं गंभीरपणं का?”
“गंभीर नाही, पण बोलायचं आहे थोडं, आपल्या समरबद्दल.”
हे ऐकताच आजीने रेडिओचा आवाज कमी केला,
“काय झालं रे माझ्या बबड्याला?(आजी समर ला लाडाने बबड्या म्हणत) परत रात्रभर जागतो का काम करत?”
वंदनाताई हसल्या,
“अहो नाही आई , ह्यावेळी कामाचं नाही... दुसरंच काही आहे.”
आजी उत्सुक, “लग्नाचं का?”
वंदनाताई हलकं हसत म्हणाल्या,
“हो , तसंच काहीसं. आज प्रतापनं सांगितलं — समरला एक मुलगी आवडते म्हणे.”
धैर्यशीलरावनी कप ठेवला,
“काय? समर? आणि मुलगी ? हि तर मोठी ब्रेकिंग न्यूज आहे! कोण आहे ती?”
वंदनाताई —
“शरयू ठाले पाटील . आपल्या गणेश मंडळातलीच आहे . प्रतापनं सांगितलं, त्याला आवडते म्हणे.”
आजी आनंदाने हसल्या,
“वा! म्हणजे माझ्या समरचंही आता घरटं बांधायचं वय झालं तर! मी म्हटलं होतं ना, ह्याच्या डोळ्यांत काहीतरी वेगळं दिसतय हल्ली.”
धैर्यशीलराव मिश्कील नजरेने म्हणाले,
“हो, आणि ऑफिसचं ताण म्हणत रोज उशिरा घरी येतो, पण मोबाईल मात्र हातातून सुटत नाही. आता खरं कारण कळलं !”
सगळे हलकं हसले.
वंदनाताई थोड्या गंभीर टोनमध्ये म्हणाल्या,
“मी विचार करतेय, आधी आपल्याला ती मुलगी पाहिली पाहिजे. मुलगी चांगली, घरसंस्कार असलेली असेल, तरच आपण पुढचं बोलणं पुढे नेऊ.”
आजी लगेच म्हणाल्या,
“हो ना, उद्या बोलव तिला घरी. थोडं बोलू, बघू.
मी तिचा चेहरा पाहूनच सांगते — ती आपल्या घरात जुळेल की नाही.”
धैर्यशीलराव हसले,
“तुमचा चेहरा-परीक्षण टेस्ट म्हणजे सगळ्यांपेक्षा भारी! पण ठीक आहे, वंदना, उद्या संध्याकाळी बोलाव. बघू या आपल्या होणाऱ्या सूनबाई कशा आहेत.”
वंदनाताई हसून मान डोलावतात,
“ठीक आहे, मी समरला सांगते. उद्या संध्याकाळी बोलवते तिला.”
आजीने मग हलक्या आवाजात म्हटलं,
“हं, आणि त्याला सांग नीट तयार व्हायला — थोडं प्रेम दिसायला हवं चेहऱ्यावर!” 😄
धैर्यशीलराव खळखळून हसले,
“आई, तुमचा नातू तर बघता बघता प्रेमातच बुडाला! आता मला माझ्या सूनबाईंच्या हातचा चहा प्यायची घाई झालीय.”
वंदनाताईने ट्रेमधले कप पुढे ठेवले आणि हसत म्हणाल्या,
“मग चला, तयारी सुरू करू.”
आणि त्या चहाच्या वाफेत मिसळलेला तो आनंद —
आई-वडिलांचं समाधान, आजीचं प्रेम आणि एका नवीन नात्याची गोड चाहूल घेऊन घरभर दरवळू लागला. 🌸
-----
रात्रीची वेळ.
घरात मंद प्रकाश, वंदनाताई हॉलमध्ये बसून पानं वाचत होत्या, पण नजरा मात्र दाराकडेच लागल्या होत्या.
काही मिनिटांतच गेट उघडल्याचा आवाज आला, आणि समर थकलेला चेहरा घेऊन आत आला.
हातात लॅपटॉप बॅग, शर्टाचे बटण वरपर्यंत बंद, चेहऱ्यावर नेहमीसारखी गंभीरता.
“आई, मी आलो गं .”
“एवढा उशीर का झाला आज?”
त्या त्याच्याकडे बघत म्हणाल्या, कपाळावरचा घाम पाहून.
“ऑफिसमध्ये मिटिंग होती, थोडी लांबली.”
तो शर्टच्या बाह्या वर करत सोफ्यावर बसला.
वंदनाताई उठून त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवतात.
“घे आधी पाणी पी , आणि जरा आराम कर. दिवसभर धावपळ करून दमला असशील .”
समर पाणी घेतो, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून विचारतो,
“काय झालं आई, काही बोलायचं होतं का?”
वंदनाताई हलकं स्मित करत म्हणाल्या,
“हो रे थोडं बोलायचं होत.”
“हंmm… एवढं गंभीर टोन आहे म्हणजे नक्कीच काहीतरी ‘स्पेशल’ आहे.”
समर थोडं हसत म्हणाला.
वंदनाताई सोफ्याच्या दुसऱ्या टोकावर बसल्या, हातातल्या पानाची घडी करत म्हणाल्या,
“आज सकाळी तुझा छोटा भाऊ काहीतरी बोलत होता, तुझ्या लग्नाबद्दल…”
समरचा हात थबकला.
“अं… काय बोलत होता तो?”
“अरे त्याचं नेहमीसारखं मिश्कील बोलणं असतं, पण त्यानं एका मुलीचं नाव घेतलं… शरयू ठाले पाटील ! ओळखतोस का तू तिला?”
समरने हसून लपवायचा प्रयत्न केला, पण चेहऱ्यावरचा रंग उडालाच.
“अं… म्हणजे ओळखतो म्हणजे… हो, थोडंफार मंडळातून ओळखतो.”
“थोडंफार की थोडं जास्त?” वंदनाताईंचा टोन हलका पण अर्थपूर्ण.
समर लाजून म्हणाला,
“आई, खरं सांगू का… ती खूप साधी आहे, चांगली आहे. मला आवडते ती. पण मी अजून काही ठरवलं नाहीये.”
वंदनाताई त्याच्याकडे मायेने बघतात,
“बाळा, ठरवायचं काही उरलंय का आता? डोळ्यांत दिसतं सगळं.
आणि तुला माहितेय का, तुझ्या डोळ्यांत आज पहिल्यांदा मला ‘समर’ नाही, तर एक प्रेमात पडलेला मुलगा दिसला.”
समर गप्प झाला.
काही क्षण वातावरणात फक्त घड्याळाचा टिक-टिक आवाज.
“आई… मी खरंच तुला सांगणार होतो , पण कसं सांगू हे कळतं नव्हतं .”
वंदनाताई त्याच्या हातावर हात ठेवतात,
“काळजी नको करू , सांगायचं काम झालंय तुझं.
समर आश्चर्याने तिच्याकडे पाहतो,
“म्हणजे… तुला सगळं माहिती आहे?”
त्या हसत म्हणतात,
“हो रे, तुझ्या छोट्या भावाने ‘ब्रेकिंग न्यूज’ आधीच दिली होती .
आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे — शरयूला पाहायचं. उद्या तिला घरी बोलाव.”
समरचे डोळे चमकले, चेहऱ्यावर एक गोंडस आनंद झळकला.
“खरंच आई?”
वंदनाताई हसत ,
“अरे तुझ्या बाबांना घाई झालीये, सुनबाईंच्या हातचा चहा प्यायची.”
समर लाजून हसला,
“आई… तू पण ना!”
आणि त्या हसण्याच्या आवाजात घरात पुन्हा एक वेगळी उब पसरली —
आईच्या आशिर्वादाची आणि प्रेमाच्या सुरुवातीची. ❤️
----
रात्र झाली होती.
ऑफिसचं काम संपवून समर बाल्कनीत बसला होता — हातात फोन, चेहऱ्यावर हलकं हसू आणि मनात शरयू.
वारं हलकं वाहत होतं, चंद्र मंद प्रकाशात लपाछपी खेळत होता, आणि समर मोबाईलवर टाइपिंग करत होता…
समर: “हाय, काय करतेस?”
काही क्षणांत उत्तर आलं —
शरयू: “काही नाही, तुमचाच विचार करत होते…”
समरच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हसू उमटलं.
समर: “अरे वा, इतक्या उशिरा माझाच विचार? काहीतरी खास असावं मग!”
शरयू: “हं, खास तर आहेच… पण सांगणार नाही.”
समर: “ठीक आहे मग, मीच सांगतो — उद्या माझ्या घरी येत आहेस म्हणून ना?” 😏
शरयूच्या बोटं कीबोर्डवर थांबली.
शरयू: “काय? तुझ्या घरी? पण का?”
समर: “अगं, इतकं घाबरतेस का? माझी आई-बाबा, आजी — सगळे भेटायचं म्हणतायत.
थोडं बघूयात, बोलूयात, तसंच घरचं वातावरण बघून तुलाही बरं वाटेल.”
शरयू: “अहो पण अचानक… माझी काहीच तयारी नाही…”
समर: “तयारी? तू फक्त हसत ये बस्स! बाकी सगळं मी बघतो.”
ती हसली.
शरयू: “तुम्ही ना, खूप स्मार्ट बोलता. पण खरंच येऊ का?”
समर: “तू नाही आलीस तर माझं घर रिकामं वाटेल. ’”
शरयू: “ तुम्ही ना असं बोलूनच मला गोंधळवता.”
समर: “अगं, गोंधळ नाही ग, सरळ बोलतोय — उद्या संध्याकाळी ५ ला यायचंय तुला.
मी प्रताप ला पाठवतो तुला पिक करायला. ”
शरयू: “आईला भेटायचं म्हणजे इंटरव्ह्यूच वाटतोय…”
समर: “इंटरव्ह्यू नाही, हा माझ्या आयुष्याचा ‘फायनल सिलेक्शन राउंड’ आहे.”
शरयूच्या चेहऱ्यावर आता गोड हसू उमटलं, पण डोळ्यांत थोडी भीतीही.
शरयू: “ठीक आहे, पण मी आले आणि त्यांनी नाही आवडले तर?”
समर: “असं होणं शक्यच नाही.
तू आलीस की सगळं घर उजळून निघेल…!”
शरयूचा श्वास अडकला, गालावर हलकी लाली पसरली.
शरयू: “तुम्ही असं बोललात की खरंच घाबरायला होतं…”
समर: “ अर्रर्र... पाटील घाबरले... असं कसं, पाटलाला शोभत नाही हे ... !" तो मिश्किल पने हसत म्हणाला.”
शरयू: “काय ओ तुम्ही इथे माझी भीतीने गाळण उडालीये आणि तुम्हाला मजाक सुचतेय .”
समर: “ घाबरू नका राणी सरकार, उद्या माझ्या घरात पाहिलं पाऊल टाकणार आहात तुम्ही - Welcome to My World Dear .” ❤️
शरयू लाजली आणि तिने शेवटचा मॅसेज केला : “Bye ! Good Night , Love You ❤️.”
समर: “Bye ! Good Night , Love You too ❤️.”
आणि त्या रात्री दोघंही झोपले —
तो तिचा विचार करत, आणि ती त्याचं नाव ओठांवर घेत. 🌙
- @ सौ. रोहिणी माने
No comments:
Post a Comment