18 Oct 2025

माझिया प्रियाला प्रीत कळेना.... 💞 भाग १३

दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजच्या प्रांगणात नेहमीसारखी गडबड होती —
हसरे चेहरे, गप्पा, आणि कॅम्पसच्या कोपऱ्यात वाजणारी गिटार.
पण काव्याचं मन मात्र शांत नव्हतं.
तिच्या नजरा सतत शरयूला शोधत होत्या.

शरयू आली.

ती नेहमीसारखीच हसरी दिसत होती,
पण काव्याच्या डोळ्यांना मात्र आज तीचं हास्यसुद्धा खोटं वाटत होतं.
दोघींचे डोळे एकमेकांवर भिडले.
क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं —  सगळं थांबून फक्त त्या दोन नजरा बोलत होत्या.

काव्या पुढे आली,
तिच्या चेहऱ्यावर संताप आणि वेदना दोन्ही दिसत होते.
“
शरयू, काल कुठे गेलीस तू?” — तिचा आवाज थरथरत होता पण त्यात एक ठामपणा होता.

शरयूने क्षणभर काही बोलली नाही.
तिचा चेहरा थोडा फिक्का झाला,
आणि ती नजर चुकवत म्हणाली,
“
का बरं? काही खास नाही... थोडं काम होतं.”

काव्या जवळ आली, तिच्या डोळ्यांत थेट बघत म्हणाली —
“
काम...? असं कोणतं काम जे मला सांगता येत नाही?”

वातावरणात अचानक ताण वाढला.
समोरचे सगळे थोडं अंतर ठेवून शांत झाले.
फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता.

शरयू थोडं गालात हसत म्हणाली,
“
काव्या, मला तुला काहीतरी सांगायचं आहे... चल, बाहेर जाऊन बोलू.”

काव्याने भुवया उंचावल्या, पण काही न बोलता ती तिच्या मागे निघाली.
कॉलेजच्या मागच्या अंगणात दोघी शांतपणे चालत होत्या —
वाऱ्याने झाडांच्या फांद्या हलत होत्या, आणि वातावरणात एक विचित्र ताण जाणवत होता.

काव्या — “हा बोल आता, काय झालं? काय सांगायचंय तुला इतकं खास?”

शरयू थोडं लाजत, नजरा खाली करत म्हणाली,
“
काव्या... माझं समर सरांवर प्रेम आहे.”

क्षणभर काव्या थिजलीच. तिचे डोळे मोठे झाले.
शरयू पुढे म्हणाली,
“
आणि त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे.”

काव्याच्या ओठांतून हळूच निघालं — “काय…?”

शरयू हसत म्हणाली,
“
हो... आणि आम्ही दोघ घरच्यांशीही बोललोय. दोघांच्या घरचे तयार आहेत लग्नासाठी.
थोड्या दिवसात सगळी तयारी सुरु होईल.”

काव्याला एक क्षणात भोवळल्यासारखं झालं.
कानातल्या सगळ्या आवाजांचा सूर हरवला.
समोर शरयू काहीतरी बोलत होती, पण तिचे शब्द आता अस्पष्ट होत चालले होते.

एकीकडे ती तिची जिवलग मैत्रीण...
आणि दुसरीकडे तिचं पहिलं आणि एकमेव प्रेम.
तिच्या आत काहीतरी कोसळलं.

काव्या काही क्षण शांत उभी राहिली — नजरा जमिनीवर, श्वास अडकलेला.
मग काहीही न बोलता ती मागे वळली आणि हळूहळू चालत निघाली.
डोळ्यांत पाणी दाटलं होतं — आता ते लपवणं अशक्य होतं.

शरयू तिच्याकडे बघत म्हणाली,
“
अशी काय ही… एवढी छान बातमी सांगितली हिला, आणि ही काही न बोलताच निघून गेली!
जाऊ दे… येईल परत, मूडी आहे ती. तिच्या डोक्यात काहीतरी असेल…”

ती हसत आपल्या केसांत बोटं फिरवत उभी राहिली,
पण तिला कल्पनाही नव्हती —
की त्या क्षणी, काव्याच्या मनात काहीतरी कायमचं तुटून पडलं होतं…

----

काव्याला काहीच समजत नव्हतं —
माघार घ्यावी की पुढं जावं?
पण पुढचं सगळं अंधारातच होतं.
फक्त आशेचा एकच किरण तिला दिसत होता —
“
एकदा तरी समरशी बोलायचं… आपल्या मनातलं त्याला सांगायचंच.”

ती डोळे पुसत, खोल श्वास घेत परत मागे आली.
शरयू तिथेच होती — खुशीत, निर्धास्त.
काव्या तिच्या शेजारी बसली, आणि तिनं जबरदस्तीने चेहऱ्यावर हसू आणलं.

शरयू उत्साहाने बोलत होती —
“
कळलं का? काल समर सरांनी मला गिफ्ट दिलं, अगदी सुंदर पेंडंट आहे ते!”
काव्या बाहेरून शांत होती, पण तिच्या आत काहीतरी उलटसुलट होत होतं.
प्रत्येक शब्द जणू तिच्या हृदयात सुईसारखा टोचत होता.

काही वेळात त्या दोघी कॅन्टीनमध्ये गेल्या.
गप्पांच्या ओघात शरयू ने मोबाईल टेबलावर ठेवला आणि म्हणाली,
“
थांब जरा, मी चहा घेऊन येते.”

आता दुपारचे बारा वाजत आले होते.
कॅन्टीनमध्ये हलका गोंगाट, पण काव्याच्या मनात प्रचंड शांतता —
एक निर्णय घेतलेल्याची.

तिने हळूच शरयूचा मोबाईल हातात घेतला.
बोटं थोडी थरथरत होती, पण डोळ्यांत निर्धार होता.
तिने समरचा चॅट उघडला...
आणि एकच मॅसेज टाईप केला —
“
संध्याकाळी भेटूया.”

क्षणभर श्वास रोखला...
मग ठिकाण आणि वेळ टाईप करून Send दाबलं.

काही सेकंदातच रिप्लाय आला —
“OK
👍”

काव्याच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित उमटलं.
तिने पटकन तो मॅसेज डिलीट केला,
मोबाईल परत तसाच टेबलावर ठेवला,
आणि मागे टेकून बसली —
मनात फक्त एकच विचार घोळत होता,
“
आज सर्व स्पष्ट होणार…”

तेवढ्यात शरयू चहा घेऊन परत आली,
“
चल, सांग काय घेणार? कटिंग की स्पेशल?”
काव्या ने फक्त हसून उत्तर दिलं.
पण तिच्या डोळ्यांत आता काहीतरी वेगळं चमकत होतं —
प्रेम, वेदना… आणि एक आगळा निर्धार.

----

संध्याकाळचे सात वाजले होते.
काव्या छान तयार झाली होती — साधी पण उठावदार ड्रेस, हलका मेकअप, आणि थोडा थरथरणारा आत्मविश्वास.
आरशात शेवटचा एक कटाक्ष टाकून ती घराबाहेर पडली.

रस्त्यात गाडीचे दिवे, वारा, आणि मनात फक्त एकच विचार —
"
आज सगळं सांगायचं… काहीही झालं तरी."

ती ठरलेल्या ठिकाणी — एका शांत कॅफे रेस्टॉरंटमध्ये पोहोचली.
ते ठिकाण खास होतं, कारण तिथे छोट्या छोट्या केबिन्स होत्या —
जणू जगापासून थोडं वेगळं कोपऱ्यातलं जग.

काव्या वेळेच्या आधीच आली होती.
वेटरने विचारलं, “मॅडम, कोणत्या केबिनमध्ये बसायचं?”
ती म्हणाली, “थ्री नंबर… मी वाट बघते.”

केबिनमध्ये मंद लाईट, सौम्य म्युझिक, आणि खिडकीतून पडणारा सायंकाळी सूर्याचा शेवटचा किरण.
ती समोरच्या खुर्चीवर बसली, पण मन मात्र शांत नव्हतं.
हातातलं पर्सचं झिप ती वारंवार उघड-बंद करत होती.

तिच्या मनात विचारांचं वादळ चाललं होतं —
“
तो आला तर काय म्हणेल?”
“
त्याला कळलं की हा मॅसेज शरयूने नाही तर मी केला, तर?”
“
कदाचित तो रागवेल… कदाचित निघून जाईल…”

तिचं हृदय जोरात धडधडत होतं.
आणि त्याच वेळी, केबिनचं पडदं हलकेच सरकला.

तिने नजर वर केली —
दरवाज्याच्या चौकटीत समर उभा होता.
फिक्कट पिस्ता रंगाचा शर्ट, नेहमीप्रमाणे कोपरापर्यंत फोल्ड केलेल्या बाह्या, काळी जीन्स, रुबाबदार उभं राहणं आणि चेहऱ्यावर तेच थोडं गोंधळलेलं पण आकर्षक हास्य.

“अरे काव्या, तू इथे कशी? आणि शरयू नाही आली का अजून?”
तो विचारताच खुर्ची ओढून बसला.

काव्याचं हृदय क्षणभर थांबलं.
घशात शब्द अडकले, श्वास जड झाला.
पण आज ती बोलणारच होती —
ज्या गोष्टी वर्षानुवर्षं तिने मनात दडवून ठेवल्या होत्या,
त्या आज बाहेर पडणार होत्या.

ती शांतपणे म्हणाली,
“
ती नाही येणार...”

समर भुवया उंचावत म्हणाला,
“
काय? पण तिनंच तर मला मॅसेज केला होता ‘संध्याकाळी भेटूया’ म्हणून!”

काव्या थरथरत्या आवाजात,
“
सॉरी... पण तो मॅसेज मी केला होता. मला... मला तुम्हाला भेटायचं होतं.”

समर गोंधळून तिच्याकडे बघत म्हणाला,
“
काव्या, नक्की काय चाललंय हे? समजेल का मला?”

काव्या पुढे झुकली, आणि थरथरत्या हातांनी त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली —
“
समर... माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर... मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय.”

क्षणभर सगळं स्तब्ध झालं.
समरचा चेहरा कठोर झाला. त्याच्या डोळ्यांत राग आणि आश्चर्य एकत्र चमकले.

“काव्या, काय बोलतेयस तू!” तो खुर्चीतून उठत म्हणाला.
“
तुला माहीत आहे ना, शरयू आणि मी एकमेकांवर प्रेम करतो. आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत.”

काव्याच्या डोळ्यांत अश्रू दाटले.
ती उठली, काहीतरी बोलायचं म्हणून पुढे गेली, पण आवाज फुटला नाही.
समर निघायला लागला.

त्या क्षणी काव्याने धावत मागून त्याला घट्ट मिठी मारली.
“
समर... प्लीज... एकदा ऐका माझं…”

समरचा राग आता उफाळून आला होता.
“
काव्या, बाजूला हो! प्लीज!”
तो ओरडला.

ती मात्र हलली नाही.
समरने तिच्या हाताला झटका दिला आणि तिला जोरात बाजूला केलं.
ती डगमगली.

तो मागे न वळताच बाहेर निघून गेला —
पण काही पावलं पुढे गेल्यावर मागून जोरात काहीतरी पडल्याचा  आवाज आला.

क्षणभर तो थांबला... पण मग पुन्हा चालू लागला.
त्याच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता —
“
तिनं असं का केलं?”

समर बाहेर निघून गेला होता.

दरवाजा आपटला आणि केबिनमध्ये काही क्षणांसाठी पूर्ण शांतता पसरली.
काव्या काही क्षण तशीच उभी राहिली…

श्वास जोरात चालला होता, आणि डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.

ती पाऊल मागे टाकत खुर्चीवर बसली —
पण डोळ्यांसमोर सगळं धूसर होत चाललं होतं.
हृदयातल्या वेदनेचा भार आता शरीरावर जाणवत होता.
तिचा श्वास मंदावला… डोकं गरगरलं…
आणि काही क्षणांतच ती खुर्चीवरून खाली कोसळली .

 

- @ सौ. रोहिणी माने 


माझिया प्रियाला प्रीत कळेना.... 💞भाग १४



No comments:

Post a Comment