16 Oct 2025

माझिया प्रियाला प्रीत कळेना....💞भाग १२

काल शरयू कॉलेजला गेली आणि काव्या शरयूला ओरडत घरी आली,
अगं शरयू, चल ना! किती उशीर करतेस तू!”

कल्याणी ताई हात पुसत किचनमधून बाहेर आल्या.
अगं काव्या, ती आताच गेली घरातून, तुला भेटली नाही का?”

काव्या भुवया उंचावत म्हणाली,
हो का बरं... बघते मी, बसस्टॉपवर असेल कदाचित. चला काकू, निघते मी.”

ती तणतणतच बाहेर पडली. झपाझप पावलं टाकत बसस्टॉपकडे आली

-----

काव्या थिजल्यासारखी तिथेच उभी राहिली. गाडीचा आवाज दूरवर विरत गेला, पण तिच्या मनात मात्र तो अजूनही घुमत होता.
कोण होता तो ?” ती स्वतःशीच कुजबुजली.
शरयूने एकदाही मागं वळून पाहिलं नव्हतं, आणि ते तिच्या मनाला चटका लावणारं होतं.

थोडा वेळ ती स्थिर उभी राहिली. आजूबाजूला कॉलेजकडे जाणारी गर्दी होती, गाड्या धावत होत्या, पण तिच्या कानात मात्र फक्त तो ओळखीचा आवाज घुमत होता — “शरयू, बस पटकन.”
तिचं हृदय जोरात धडधडू लागलं.

हा आवाज... अगदी कुणासारखा वाटला?” ती विचार करतच फोन पुन्हा लावते.
पण पुन्हा तोच संदेश — “The number you are calling is out of coverage area.”

काव्याने ओठ चावले.
शरयू, तू असं का केलंस?”

तिच्या डोळ्यात थोडं पाणी आलं, पण त्याच वेळी तिच्या मनात एक ठाम विचार आला
ही गोष्ट मला कळल्याशिवाय राहणार नाही.”

ती वळली, आणि बस थांब्याकडून कॉलेजकडे जायला लागली.
मनात अनेक प्रश्न होते
ती गाडी कोणाची होती? तो आवाज कोणाचा होता? आणि शरयू एवढी गुपितपणे कुठे चालली होती?

खरं तर तिला शरयूचा खूप राग आला होता.
शरयू आणि तीबालपणापासूनच्या जिवलग.
शाळेच्या पहिल्या बेंचवर एकत्र बसायचं, परीक्षा आली की एकमेकींच्या वहीत लिहायचं, आणि छोट्या छोट्या गोष्टींवर भांडून पुन्हा काही क्षणांत हसत सामजस्य करायचं
त्या दोघींच्या आयुष्यात "मी आणि तू" असं काहीच नव्हतं, फक्त "आपण" होतं.

आता मात्र त्या "आपण"च्या मध्ये एक भिंत उभी राहिल्यासारखं तिला जाणवत होतं.
शरयूने तिच्यापासून काहीतरी लपवलं,
आणि ते काय आहे हे कळणंहेच काव्याच्या मनाला सर्वात जास्त चटका लावणारं होतं.

राग, दुखावलेपणा आणि संशय
सगळं एकाच वेळी तिच्या मनात उसळून आलं होतं.
तिचं मन जणू प्रश्नांनी भरून गेलं
शरयू अशी का वागतेय?”
ती मला काही सांगत का नाही?”

क्षणभर ती गप्प बसली.
डोळ्यात पाणी जमा झालं, पण आवाजात एक हळवा तुटलेपणा होता
आपल्यात असं अंतर कधी आलं…?

तीच्या आवाजात केवळ राग नव्हता,
तर हरवलेल्या विश्वासाचं ओझं होतं.

----

रागारागात काव्याने फोन काढला.

बघू तरी, काही मेसेज केला का हिने...” ती कुजबुजली.

ती पटकन व्हॉट्सअॅप उघडते. कॉलेजच्या ग्रुपवर एक नवीन फाईल आलेली दिसते — “Practice Day – Final Video”
कसली फाईल आहे ही?” म्हणून ती डाउनलोड करायला लागते. पण लगेच फोनवर मेसेज झळकतो — “Storage full.”

अरे देवा!” ती वैतागून डोकं हलवते आणि गॅलरी उघडते.
थोडं साफसफाईचं काम करू या...”

ती फोटो डिलीट करत जाते. पण अचानक तिची बोटं एका फोटोवर थबकतात.
तो फोटो ढोलच्या प्रॅक्टिसचाती, शरयू आणि योगिता एकत्र हसतायत.

पण त्या फ्रेमच्या कोपऱ्यात काहीतरी वेगळंच तिचं लक्ष वेधून घेतं
तीच गाडी!
तोच रंग, तोच नंबर... जिच्यात काही वेळापूर्वी शरयू बसून गेली होती!

काव्याचा श्वास अडकतो.
म्हणजे  - म्हणूनच... तो आवाज ओळखीचा वाटला!”

तिने पुन्हा फोटो झूम केला.
आता प्रश्नांचा महापूर मनात उसळला
गाडीत नेमकं कोण होतं? समर की प्रताप?

कारण ती गाडी कधी समर आणायचा, तर कधी प्रताप.
आणि त्यांच्या आवाजातला थोडाफार फरकतोसुद्धा इतका हलका, की डोळे मिटून ओळखणं जवळपास अशक्य होतं.

काव्या फोटोकडे पाहत राहिलीडोळ्यात संशय, मनात गोंधळ, आणि हृदयात एक अजब वेदना...

तिनं राहून प्रतापला फोन लावला.

काव्या: “हॅलो…”

प्रताप: “हा बोल काव्या! कशी आहेस? आणि आज अचानक कॉल?”

काव्या: “काही नाही, असंचतुमची आठवण आली म्हणून फोन केला.”

प्रताप (हसत): “अरे वा! माझी आठवण आणि ती पण तुला ? ते कसं काय ?”

काव्या: “तुम्ही इकडे आला होतात का? आत्ताच मला मागून कुणीतरी दिसलं, अगदी तुमच्यासारखचंम्हणून वाटलं तुम्हीच होता का विचारावं.”

प्रताप: “नाही गं, मी तर फॅक्टरीतच आहे. सध्या खूप कामाचा लोड आहे, कुठे हलताही येत नाही.”

काव्या: “बरं बरं, चालू द्या तुमचं काम. मी उगाच वेळ घेतला तुमचा, ठेवते हं.”

एवढं बोलून तिनं फोन कट केला. कॉलदरम्यान मागून मशीनचा आवाज स्पष्ट ऐकू येत होताम्हणजे प्रताप खरंच फॅक्टरीतच होता.

ती थिजल्यासारखी काही क्षण फोनकडे पाहत राहिली.
मग शरयू कुणासोबत गेली?”


तिच्या ओठांतुन आपोआप बाहेर पडलं — समर...?”

तो एकच शब्द तिच्या मनात घुमू लागला.

आता सगळं गोंधळलेलं होतंराग, संशय, आणि थोडीशी भीतीही.

 त्यांच्यात खरंच जर काही असेल तर...?”
काव्याच्या ओठांतून शब्द बाहेर पडले आणि ती स्वतःच दचकल्यासारखी झाली.
क्षणभर थांबली, पण पुढच्याच क्षणी तिचं मन उसळलं
नाही... नाही असं होऊ शकत नाही! समर फक्त माझा आहे!”

हे शब्द बोलताना तिचा आवाज थरथरत होता, आणि डोळ्यात पाणी जमा झालं होतं.
तिनं फोन टेबलावर ठेवला, आणि दोन्ही हातांनी चेहरा झाकला.

खरं तर मागची चार वर्ष ती त्यांच्या मंडळात ढोल वाजवायला जायची,
पण तिचं कारण ढोल नव्हतं — समर होता.

त्याचा तो रुबाबदार अंदाज, रांगडेपणा 
ढोल वाजवताना त्याच्या कपाळावरचा येणारा घाम,
आणि त्याची ती करारी नजरजी थेट मनात शिरायची.
काव्याचं हृदय नेहमीच त्याच्याकडे झुकलेलं होतं.

तो हसला की तिच्या छातीत फुलं फुलायची,
आणि त्याने दुसरीकडे बघितलं की तिचं मन बेचैन व्हायचं.
पण हे सगळं ती फक्त स्वतःशीच बोलायची
कारण तिने कधी हिम्मत केली नव्हती हे सांगायची .

शरयू तिची जिवलग होती
पण हाच एक विषय तिने आयुष्यभर तिच्यापासून लपवला होता.
आणि आज, तिच्या मनातली ती एक गोष्ट सांगण्याची चूक
तिला अंगावर आल्यासारखी वाटत होती.

ती थोडा वेळ गप्प बसली. मग ठाम नजरेने आरशात स्वतःकडे पाहिलं.
नाही, यावेळी मी गप्प बसणार नाही... शरयूला विचाराव लागेल .”

तिच्या डोळ्यात आता वेदनेपेक्षा निर्धाराच्या ज्वाळा दिसत होता.
डोळ्यांभोवती अश्रूंची ओल अजून होती, पण मन मात्र आता पक्कं ठरलं होतं
यावेळी गप्प बसायचं नाही.”

शरयूने तिला कधीच काही सांगितलं नव्हतं
ना समरबद्दल, ना त्या गाडीत बसण्याबद्दल.
आणि हेच तिच्या मनात काट्यासारखं रुतत होतं.

काव्या रागात धुसफुसत उठली.
तीने केस घट्ट बांधले, आरशात स्वतःकडे पाहिलं
ओठ घट्ट मिटलेले, नजरेत तीव्र ज्वाला.

खिडकीतून बाहेर बघितलं,
संध्याकाळचा वारा तिच्या चेहऱ्यावर येऊन आपटला,
पण तिच्या मनातला वादळ अजूनही थांबत नव्हता.

उद्या भेटतेच तिला... सगळं विचारायचंच.
ती पुटपुटली.

त्या क्षणी काव्या फक्त एक मैत्रीण नव्हती
ती होती एका तुटलेल्या विश्वासाची साक्षीदार,
आणि तिच्या डोळ्यात आता रागापेक्षा जास्त
सत्य जाणून घेण्याची जिद्द होती.

 

- @ सौ. रोहिणी माने 


माझिया प्रियाला प्रीत कळेना.... 💞 भाग १३





No comments:

Post a Comment