11 Oct 2025

माझिया प्रियाला प्रीत कळेना.... 💞 भाग ५

गणपती विसर्जनाच्या आधीची रात्र. ढोलाच्या ठेक्यावर सराव सुरु असतो.

चंद्रप्रकाशात तिच्या चेहऱ्यावर चमक उमटते. ती केस मागे सारते, ढोल वाजवते, आणि त्याच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या.

तो पुढे येतो.
“शरयू, हात सरळ ठेव, नाहीतर बीट चुकीचा पडतो…”
असं म्हणत तिच्या मागे उभा राहतो, तिचे हात आपल्या हातात घेतो.

ढोलाचा ठोका वाढतो, पण त्यांच्या हृदयाचे ठोके त्याहून जोरात.
त्याच्या श्वासाचा स्पर्श तिच्या मानेवरून जातो. तसं ती अंग आक्रसून घेते, 
सर्वांग शहारत, ती डोळे मिटते.
क्षणभर तिला वाटतं — जग थांबलंय.

---

सराव संपला होता. आकाशात अचानक मेघ दाटले.
सगळे घाईघाईने घरी गेले.
शरयू मैदानात अजून सामान गुंडाळत होती.

तेवढ्यात समर बाइक घेऊन येतो.
“चल, सोडतो तुला.”

ती आधी नाही म्हणते, पण मग पाऊस कोसळायला लागतो.
दोघं बाइकवर बसतात.

बाइक वेगाने धावत असते, आणि शरयू मागून त्याला घट्ट धरून बसते.
त्याच्या पाठीवर तिच्या हाताचा स्पर्श जणू त्याला वेडा करून टाकत होता.

रस्त्यात समर बाइक थांबवतो.
ओली झालीस ना ?”
ती मान हलवते. केसांमधून पाणी टपकत होतं.

तो तिच्याकडे एकटक बघतो.
“तू अशी भिजलेली दिसलीस ना कि   … मी स्वतःला रोखू शकत नाही.”

तो तिचा हात हातात घेतो.

हळूवार तिच्या खांद्यावरून समोर आलेले केस मागे सारत .
“तुला माहित आहे का, ढोलचं ठोकं हृदयाच्या ठोक्यासारखं असतं… पण माझं हृदय, तुझ्यासमोर आलं की ताल विसरूनच जातं.”

शरयू श्वास रोखून उभी. गाल लाल झालेले.
ती कुजबुजते – “समर… लोक बघतील…”

तो हलकं हसतो – “आत्ता इथे फक्त आपण दोघंच आहोत.”

क्षणभरात त्याचा हात तिच्या गालावर येतो.
ती घाबरते, लाजते, पण नजरेतून पळू शकत नाही.
आणि त्याच क्षणी —
त्यांचे ओठ जुळतात.

पहिलाच किस.
हळुवार, पण मनाच्या प्रत्येक कोपऱ्याला हलवणारा.
फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज.

शरयूच्या डोळ्यांत भीती, लाज, पण त्याहून जास्त ओढ.

क्षणात तो तिला आपल्या मिठीत ओढतो.
पावसाच्या सरींमध्ये ती श्वास रोखून त्याच्या मिठीत वितळते.

पाऊस थांबतो.
आणि दोन हृदये, दोन आत्मे – कायमचं एक होण्याच्या मार्गावर निघतात.

---

गणपती स्थापनेचा  दिवस. मिरवणुकीची सुरुवात झाली होती. 

गावातल्या रस्त्यावर रोषणाई उजळली होती. फुलांच्या गंधाने हवा दरवळली होती. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात ढोल-ताशांचा आवाज आकाशाला भिडत होता.

समरच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे ठामपणा होता, पण आज त्याच्या डोळ्यांत वेगळी चमक होती. गेल्या काही दिवसांत मनात जी भावना डोकावत होती, तिचं नाव अजून त्याने स्वतःला कबूल केलं नव्हतं.

तो बाप्पा कडे बघत मनाशी पुटपुटला –

“हे काय आहे बाप्पा? तिच्या  मनातही हेच आहे का?

अचानक गणपतीच्या मूर्तीवरून एक लाल गुलाबाचं फूल खाली पडतं, समरचे डोळे विस्फारतात. त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटतं.

“हेच तुझं उत्तर आहे का बाप्पा?”

 मिरवणूक पुढे सरकत असते. समोर शरयू ढोल वाजवत असते. समरच्या नजरेला नजर भिडली की बीट आणखी जोरात पडत होता.

लोकांमध्ये फक्त ढोलाचा आवाज होता, पण त्यांच्या मनात मात्र एकमेकांची धडधड.
प्रत्येक क्षणी त्यांना फक्त तेच दिसत होते.

समर थेट तिच्या जवळ येतो. डोळ्यांनीच तिचं लक्ष वेधतो. मग हात पुढे करतो – चाटी डंका मागतो.

शरयू थोडी घाबरून त्याच्या डोळ्यांत बघते. तिच्या चेहऱ्यावर लाजरा गोंधळ.

ती अलगद चाटी डंका त्याच्या हातावर ठेवते.

 

त्याच क्षणी तो तिच्या मागे उभा राहतो. तिचे हात आपल्या हातात घेत ढोल वाजवू लागतो. ठोक्यांचा कंपन एकाच वेळी दोघांच्या अंगातून वाहू लागत.

ढोलाचे ठोके जणू हृदयाचे ठोके झालेले. त्याचे श्वास तिच्या केसांवरून, गालावरून स्पर्श करून जातात.

शरयूला स्वतःचं शरीर शहारल्यासारखं वाटतं. डोळ्यांत नकळत पाणी येतं – आनंदाचं की भीतीचं, हे तिलाच कळत नाही.

 

समर तिच्या कानाशी कुजबुजतो –

“ओ ठाले पाटील… संसाराचा ढोल पण माझ्यासोबत असाच वाजवशील का?”

 

क्षणभर वेळ थबकतो. आवाज थांबतो. फक्त ढोलाचे आणि हृदयाचे ठोके.

 

शरयूच्या ओठांवर हलकं स्मित, पण शब्द मात्र येत नाहीत. ती फक्त लाजून खाली बघते.

दोघांच्या नकळत्या प्रेमाचा पहिला ठोका तिथेच उमटतो.

दूरून प्रताप हे सगळं पाहत असतो. दादाच्या चेहऱ्यावरचं हसू, शरयूच्या डोळ्यांतील लाजरा आनंद – सगळं काही त्याच्या लक्षात येतं.

---

दुसऱ्या दिवशी रात्री. मंडळाचं काम आटोपून समर आणि प्रताप घरी परतत होते. बाहेर आकाशात चंद्र ढगांआड लपाछपी खेळत होता.

प्रतापने समरकडे पाहिलं –

“दादा, काही दिवसांपासून तु बदललेला दिसतोय. आधी एवढं कमी बोलायचा, आणि आता….?”

 

समर शांत होता. थोडा वेळ गाडी सरळ चालवत राहिला. मग खोल श्वास घेत म्हणाला –

“हो प्रताप… एक मुलगी आहे. तिचं हसू पाहिलं की ढोलाचे सगळे ठोके थांबतात. तिचे बोलणे ऐकलं की वेळच थांबतो.”

 

प्रताप हसला त्याला अंदाज आलेला पण त्याला ते समरच्या तोंडून ऐकून खात्री करून घ्यायची होती 

“आणि ती भाग्यवान कोण?”

 

समरने गाडी बाजूला लावली. काच खाली केली. आकाशाकडे पाहून अलगद म्हणाला –

“शरयू.”

 

प्रताप क्षणभर थबकला. मग खट्याळपणे म्हणाला –

“अरे वा! … माझी ‘वहिनी ठरली की मग ….!”

 

तो शब्द ऐकताच समरच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. मनातली धाकधूक जणू दूर झाली.

दुसऱ्या दिवशी मंडळात  प्रतापने शरयूला पाहताच हाक मारली –

“काय म्हणता वहिनी?

 शरयूच्या गालावर गडद लाली उमटली. ती पटकन नजरेतून नजर चुकवू लागली.

 

समर थोडा दूर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं, जिंकलेल्या युद्धासारखं हास्य होतं. त्याला ठाऊक होतं – आता शरयू ला केवळ त्याच्या मनानेच नाही तर प्रताप च्या मनानेही मान्यता दिली होती.

 

त्या क्षणी शरयूच्या मनात प्रेम, लाज आणि आनंद सगळं एकत्र दाटून आलं. तिला जाणवलं —

समरची दुनिया तिच्याशिवाय अपुरी आहे.

---

गणपती विसर्जनाची गर्दी ओसरली होती. ढोलताशांचा आवाज शांत झाला होता, पण शरयूच्या मनात मात्र अजूनही समरच्या नजरेचं ओझं होतं.

 

त्या दिवशी, कॉलेज संपल्यावर ती एकटी मैदानाच्या कोपऱ्यात बसली होती. हवेत मंद वारा होता. अचानक मागून पावलांचा आवाज ऐकू आला.

 

ठाले पाटीलइथे एकट्या का बसलात?” – परिचित आवाज.

 

ती दचकली. वळून पाहिलं तर समर उभा होता. पांढरा शर्ट, साधा चेहरा, पण डोळ्यांत अपार आपुलकी.

 

शरयूने गप्प बसून जमिनीवर नजर खुपसली.

समर तिच्या शेजारी येऊन बसला. काही क्षण शांतता होती. मग तो हळू आवाजात म्हणाला –

तुझ्या डोळ्यांत प्रश्न दिसतोयकाय झालंय  सांगशील का?”

 

शरयूच्या डोळ्यांत पाणी आलं. ती घाबरत, अडखळत म्हणाली –

सर मला एक सांगायचं होतं पण कसं सांगावं ते कळेना.”

 

समरने तिचा हात अलगद हातात घेतला. तिला धीर दिला

शरयूने डोळे मिटले. मग धैर्य एकवटून बोलली –

मलाही तुमच्याविषयी तसंच वाटतं. जसं तुम्हाला माझ्याविषयी वाटतं.”

 

समरचा श्वास थबकला. तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. नंतर हसत म्हणाला –

म्हणजे संसाराचा ढोल खरंच आपण दोघांनी मिळून वाजवायचा ठरवलाय?”

 

शरयू लाजून मान खाली घालून हसली. गाल लाल झाले.

समरने हळूच तिचा चेहरा हातात घेतला, आणि डोळ्यांत डोळे घालून पाहिलं. त्या क्षणी ढोलाच्या प्रत्येक ठोक्यापेक्षा जास्त गडगडाट त्यांच्या हृदयात होत होता.

 

वारा जोरात सुटला, पानं सळसळली, आणि त्या शांत मैदानावर दोन मनांनी पहिलं खरं प्रेम कबूल केलं होत.

 

---

 

- @ सौ. रोहिणी माने

 

 

 माझिया प्रियाला प्रीत कळेना....💞 भाग ६


No comments:

Post a Comment