13 Oct 2025

माझिया प्रियाला प्रीत कळेना....💞 भाग १०

दुसऱ्या दिवशी दुपारनंतर…

समर ऑफिस मध्ये होता, पण मन मात्र कुठेतरी शरयू जवळ भटकत होतं.
तो फोनवर प्रतापला मेसेज करतो —
“ प्रताप प्लीज तू शरयूला घेऊन येशील … मी थेट घरी भेटतो.”

प्रतापच्या चेहऱ्यावर खोडकर हसू उमटलं.  त्याने लगेच उत्तर दिलं —
“नेकी और पुच पुच... आणतो ना भाई त्यात काय एवढं.... लो चला मै अपनी भाभी को घर पे लाने..... लो चला मै ...... 😏”

समर हसत : “ फक्त वेळेत पोहोच .”

प्रताप : “ Yess बॉस  .”

-----

संध्याकाळी पावणेपाच  वाजता,
शरयू कॉलेज जवळ उभी होती — हलका गुलाबी सलवार, कानात छोटे झुमके, वाऱ्याने केलेला केसांचा गोंधळ, आणि चेहऱ्यावर उत्सुकता.

तेवढ्यात प्रतापची गाडी समोर थांबली.

प्रताप (हसत): “चला वाहिनी साहेब , आपणास घेण्यासाठी खास गाडी आली आहे.”

शरयू (थोडी लाजत): “काय तुम्ही ?”

प्रताप: “आजची विजीट  ‘व्हीआयपी ’ आहे. दादा नी सांगितलंय.... !”

शरयू हसत गाडीत बसली.
शरयू: “तुमचे भाऊ सुद्धा काही कमी नाही, असं काही बोलता की मन धडधडायला लागतं .”

शरयू गालात हसली, आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली.

गाडी शहरातून बाहेर पडून कॉलनीकडे वळली.
संध्याकाळचं सोनेरी उजेड अंगावर पडत होता, आणि तिच्या चेहऱ्यावर एक निरागस चमक.

प्रताप (थोडं हळू आवाजात): “बाय द वे, वाहिनी , घाबरू नकोस…
आई थोडी गंभीर दिसते, पण दादा वर खूप प्रेम आहे तिचं .”

शरयू: “… मी काहीतरी चूक बोलले तर?”

प्रताप: “चूक? तू काहीही बोललीस तरी त्यांना आवडेल, Don't Worry !”

गाडी आता धैर्यशीलरावांच्या बंगल्यासमोर थांबली.
दार उघडताच प्रताप म्हणाला —

प्रताप: “चला वाहिनीसाहेब ,  तुमचं स्वागत आहे ‘समर विश्वात ’.

इथं तुमचं मनही गुंग होईल आणि आमचा दादा पण!”

शरयूने त्याच्याकडे मिश्कील कटाक्ष टाकला.
शरयू: “तुम्ही ना, बोलण्यात सगळ्यांना हरवाल!”

प्रताप (हसत): “ते माझं कामच आहे.... !”

ते दोघं आत शिरले —
आणि घरात सुगंध दरवळला… आईने चहा ओतला, आजीने रेडिओचं व्हॉल्युम कमी केलं,
आणि वाऱ्याने पडदा हलकासा डोलत राहिला —

तिच्या अंगावरच्या हलक्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमुळे संपूर्ण हॉल उजळून गेला जणू.
वंदनाताई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या — त्यांच्या चेहऱ्यावर एक उबदार हसू.

वंदनाताई (हलकं हसत): “ये आत ये .”

शरयू वाकून नमस्कार करत म्हणाली, - : “नमस्कार काकू.”

वंदनाताई तिच्या डोक्यावर हात ठेवतात, - " सुखी रहा. "

तेवढ्यात सुमतीबाई रेडिओचं व्हॉल्युम कमी करत म्हणाल्या,

सुमतीबाई: “अगं वंदना, हीच का ती शरयू का जीचा उल्लेख प्रताप कालपासून करत होता?”

वंदनाताई (हसत): “हो आई, हीच.”

सुमतीबाई: “बरं बरं… ये बाळ, इथं बस. तुला बघून वाटतंय घरात वसंत आला, घर अगदी उजळून गेलंय ... !”

सगळे हसले.
शरयू थोडीशी लाल झाली. 

तेवढ्यात धैर्यशीलराव हॉलमध्ये आले, हातात पेपर घेत.
त्यांनी शरयूला पाहिलं, आणि क्षणभर थांबले. - “ शरयू ना, समर सांगत होता?”

शरयूने आदराने हात जोडले, आजीला आणि त्यांना वाकून नमस्कार केला, 

धैर्यशीलराव (हसत): “बरं, बरं… समरचा चेहरा का इतका उजळतोय हे आता कळलं.”

सगळे पुन्हा हसले.
वातावरण हलकं-फुलकं, पण कुठेतरी एक गोड भावनांचा प्रवाह वाहत होता.

वंदनाताईने प्रेमाने विचारलं, -  “शरयू, चहा की सरबत?”

शरयू (हळू हसत): “चहा चालेल … .”

वंदनाताई थोड्या क्षणभर गप्प राहिल्या — त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदी शांतता होती.

तेवढ्यात दार उघडलं —
समर आत आला, हातात बॅग, चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत चमक.
त्याने शरयूला पाहिलं, आणि थोडा वेळ काहीच बोलला नाही… फक्त तीच्याकडे पाहत राहिला.

प्रताप (खुसखुसत): “आता दादाला काही बोलायचं कारणच उरलं नाही वाटतं.”

समर त्याच्याकडे एक कटाक्ष टाकतो आणि हळूहळू हॉलमध्ये शिरतो.

त्याचे पाऊल जणू जमिनीवर पडत नव्हते — हलकेच, मोजके, आणि सरळ तिच्याच दिशेने.

शरयू लाजून मान खाली घालते.

समर (हलकं हसत हळू आवाजात, फक्त तिला ऐकू येईल इतक्या टोनमध्ये):: “ इतकी ओळख असूनही एवढी का लाजतेय ? काल मेसेजवर तर एवढी धडधड बोलत होतीस…”

शरयू थोडी लाजली, आणि गालात हसत समोर बसली.
समर तिच्या जवळ येऊन हलकं हसला — डोळ्यांत गोड चमक आणि थोडं मिश्कीलपणा.

तेवढ्यात वंदनाताई चहा घेऊन आल्या - 
“चला, चहा घ्या . आज घरभर गोड हवा आहे, आणि शरयू तू आलीस म्हणून ती हवा अधिकच गोड झालीये ” 😄

शरयू हसली, थोडं लाजत,
“… ज्या घरातली माणसं इतकी गोड आहेत, तिथे हवेच काय .”

सगळ्यांच्या हशात वातावरण पुन्हा उजळलं. त्या क्षणात घरात फक्त एकच जाणवत होतं —

आता घरात केवळ चहाचा सुवास नव्हता — तर नव्या नात्याच्या सुरुवातीचा सुगंध दरवळत होता. ☕🌸

----

समर आणि शरयू दोघेही खूप आनंदात होते.
हो, प्रेमाची पहिली लढाई त्यांनी जिंकली होती, पण अजून एक मोठं रणांगण बाकी होतं —

शरयूच्या घरच्यांचा होकार..... आणि आता परीक्षा समर ची होती 

संध्याकाळचा शांत वेळ होता. 

शरयू थोडी घाबरलेली, पण उत्सुक होती. समर मागणी घालायला तिच्या घरी येणार होता. ती त्याचीच वाट पाहात होती.  

समर आणि प्रताप शरयूच्या घराबाहेर पोहोचले.

त्यांनी दार वाजवलं तसं शरयू च्या आई म्हणजे कल्याणी ताईनी दरवाजा उघडला. 

समर पुढे सरकला — हात जोडून आदराने नमस्कार केला.

समर:

“नमस्कार काकी. मी समर धैर्यशील शिर्के पाटील , शरयू आमच्याच मंडळात ढोल वाजवायला येतं होती.”

शरयूच्या आई-बाबांमध्ये हलकी आश्चर्याची झळक जाणवली, पण त्यांनी शांतपणे बसून समरकडे लक्ष दिलं.

शरयू च्या आईने त्यांना पाणी देतं विचारलं - " काय घेणार तुम्ही चहा कि कॉफी ?"

समर - " काहीही चालेल .... "

कल्याणी ताई कॉफी घेऊन आल्या त्यांनी सगळ्यांना कॉफी दिली, शरयू मधल्या दरवाजात उभं राहून सगळं ऐकत होती, पण समोर यायची तिची हिम्मत झाली नाही, आई बाबा कसे रिऍक्ट होतील याचं तिला टेन्शन आलं होत. 

समर - काका माझी स्वतःची गारमेंट फॅक्टरी आहे, हा माझा लहान भाऊ प्रताप, काका जरा स्पष्टच बोलतो, माझं शरयू वर खूप प्रेम आहे, आणि  तिचंही माझ्यावर प्रेम आहे, मला तिच्याशी लग्न करायचं आहे, पण त्यासाठी मला आधी तुमचा आशीर्वाद आणि परवानगी हवी.. " 

समर चे शब्द ऐकून त्यांना धक्काच बसला, पण तरीही त्यांनी स्वतःला सावरलं. 

समर चं म्हणणं लक्षात घेऊन त्यांनी समर ची जुजबी चौकशी केली, कारण शिर्के पाटील ग्रुप च नाव कोल्हापुरात प्रख्यात होतं आणि त्यांनी ही ते ऐकलं होतं. 

समरच्या आवाजात तीव्रता नव्हती — पण एक प्रामाणिकपणा होता, जो थेट मनात उतरावा असा.

कल्याणी ताई आणि रामराव दोघेही एकमेकांकडे पाहत काही क्षण गप्प राहिले.

रामरावांनी हळूच आवाज दिला  —
“शरयू... इकडे ये बाळा.”

शरयू हळूहळू समोर आली — चेहऱ्यावर भीती आणि ओठांवर थरथरणारं स्मित.
आई तिच्या पाठीवर हात फिरवत मृदू आवाजात म्हणाली —
“घाबरू नकोस बाळा. जे खरं आहे तेच सांग.”

शरयूने समरकडे पाहिलं — त्या नजरेत सगळं होतं.
ती एक दीर्घ श्वास घेऊन शांतपणे म्हणाली —

" हो बाबा हे खरं आहे, माझं प्रेम आहे यांच्यावर, आणि मला यांच्याशीच लग्न करायचं आहे. "

क्षणभर सगळं थांबलं.
रामराव आणि कल्याणी ताईंनी एकमेकांकडे पाहिलं — आणि चेहऱ्यावर हळूहळू समाधानाचं स्मित उमटलं.

कल्याणी ताई (हसत):
“तुमचं प्रेम इतकं खरं असेल, तर आमचाही मनापासून होकार आहे.”

शरयूच्या डोळ्यांत अश्रू दाटले, आणि समरने हलकं हसत तिच्याकडे पाहिलं.

रामराव काही क्षण शांत राहिले, समोर बसलेल्या समरकडे बारकाईने बघत.
समरच्या डोळ्यांत प्रामाणिकपणा दिसत होता — चेहऱ्यावर ना हट्ट, ना अहंकार… फक्त आपुलकी.

रामराव (थोडं हसत):
“बरं हे तुमचं झालं … पण तुमच्या घरच्यांचं काय? त्यानाही माहिती आहे का सगळं?”

समर (हसत, आत्मविश्वासाने):
“हो काका. माझ्या घरच्यांना सगळं माहिती आहे.
ते तयार आहेत लग्नाला..... , शरयू पसंत आहे त्यांना सून म्हणून ...

कल्याणी ताई हसल्या, आणि शरयूच्या केसांवर हलकं हात फिरवलं —

“बरं झालं मग, पण सगळी बोलणी नीट करावी लागतील .
एकदा तुमच्या आई-बाबांना घेऊन या, भेटून मग पुढचं ठरवू.”

समर (आदराने):
“हो काकी, नक्की. मी लवकरच घेऊन येतो सगळ्यांना.”

प्रतापने खोडकरपणे कुजबुजला  —

“दादा, परीक्षा तर पास झाली… आता लग्नाच्या तयारीला लागा!”

घरभर हशा, हसू, आणि नव्या प्रेमाच्या सुगंधाने भरून गेलं.
कॉफी थंड झाली होती, पण त्या क्षणाचं ऊबदारपण मात्र कायमचं मनात साठलं होतं. ☕💖 

----

आकाशात थोडीशी गुलाबी झाक होती. वार्‍यात मोगऱ्याचा गंध, आणि शरयूच्या घराच्या ओट्यावर नव्या रांगोळीत मोत्यासारखे रंग चमकत होते.
कल्याणी ताई आणि रामराव दोघेही उत्साहात पण थोड्या तणावात होते. आज शिर्के-पाटील पहिल्यांदा येणार होते .

शरयू घरात इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. कधी आरशात केस बघायचे, तर कधी आईला विचारायचं —
“आई, हे ठीक दिसतंय ना?”

आई हसत म्हणाली,
“हो गं, तू तर आधीच सुंदर आहेस, जरा शांत बस आता. पाहुणे येतंच असतील.”

इतक्यात गाडीचा हॉर्न वाजला .
शरयूच्या हृदयाची धडधड वाढली

समोरच्या गेटमधून समर आत आला —
पांढरा शर्ट, हलकी निळी जीन्स, आणि चेहऱ्यावर एक ओळखीचं नम्र हसू.
त्याच्या मागोमाग वंदनाताई, धैर्यशीलराव आणि प्रताप.

समर पुढे होत नमस्कार करत म्हणाला —
“नमस्कार मामा , नमस्कार मामी .” (आजच्या भेटीने त्यांचं नातं बदलणार होत, त्यावर जणू त्यानं शिक्कामोर्तब च केलं मामा, मामी म्हणतं )

त्याच्या तोंडून मामा, मामी एकूण आधी रामराव थोडे गोंधळले पण लक्षात आलं तसं ते गालात हसले. 

रामराव (उठत, आनंदाने):
“या या, स्वागत आहे तुमचं! , आमचं घर थोडं छोटं आहे. ”

वातावरणात गोड औपचारिकता होती.
कल्याणी ताई कॉफी आणि नाचणीचे थालीपीठ घेऊन आल्या.

दोन्ही आई-बाबा हसत बोलत होते, आणि समर-शरयू मात्र दोघंही चोरट्या कटाक्षांनी एकमेकांकडे पाहत होते.
शरयूच्या डोळ्यांत एक अवघडलेली लाज होती, आणि समरच्या नजरेत एक दिलासा.

रामराव (गंभीर पण मवाळ सुरात):
“धैर्यशीलराव, तुमचा मुलगा फार सरळ आणि सच्चा आहे.
त्याचं बोलणं, वागणं... सगळंच भावलं आम्हाला.”

धैर्यशीलराव (हसत):
“आमच्यासाठी पण शरयूसारखी सून मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे.
मुलांनी घेतलेला निर्णय योग्य वाटतोय.”

कल्याणी ताई आणि वंदनाताई एकमेकींकडे पाहून हसल्या —
त्या हसण्यात संमती होती.

शरयूच्या डोळ्यात पाणी आलं, ती हसली.समरने हलकं मान खाली घालत डोळ्यांनीच सांगितलं — “सगळं ठीक झालंय ”

चहा-नाष्ट्या होत आला.  प्रतापने लगेचच वातावरण हलकं केलं —
“काकू, तुमच हे थालीपीठ खूप भारी आहे, पण दादा सांगत होता तुम्ही उपमा पण मस्त करता म्हणे… पुढच्या भेटीत मिळेल ना?”

सगळे हसू लागले.
समरने प्रतापकडे बघत डोळ्यांनीच सांगितलं — “थोडं शांत बस!”

धैर्यशीलराव हलक्या आवाजात म्हणाले —
“आम्हाला काही अट नाही. फक्त दोघांचं सुख महत्वाचं.”

रामरावही हसून म्हणाले —
“आणि आम्हालाही तेच हवं आहे.”

थोड्याच वेळात चहाचा कप रिकामा झाला, आणि दोन घरांच्या मनांत एक नातं भरून आलं.
ना कुठली औपचारिकता, ना मोठेपणा — फक्त साधं, पण मनापासूनचं नातं. शरयू-समरच्या प्रेमकथेचं एक नवीन पान सुरू झालं. 💞


- @ सौ. रोहिणी माने 


माझिया प्रियाला प्रीत कळेना....💞भाग ११



No comments:

Post a Comment