19 Oct 2012

चारोळ्या

प्रतीबींबासाठी तहानलेलं
एक तळं आहे माझ्या मनात
जसा पूर्ण बहरून चाफा राहतो
एकटाच दूरच्या रानात....

नेमका तो क्षण कुठला?
आपण भेटल्यावर तू मला आवडल्याचा
आता होत राहतो पश्चाताप
तो क्षण हातून दवडल्याचा...

तुझं माझ्याकडॆ बघणं म्हणजे
लाटेचं किनार्याकडॆ पोहोचणं असतं
आणि माझ्यापूरतं बोलायचंतर
कवितेची नवी ओळ सुचणं असतं.

खूळा म्हंटलंकी रागवायचास
हे आता आठवत नसेल तुला
पण माझ्या मनात झूलत राहतो
या अशाच आठवणींचा झुला...

अधूरं स्वप्नं पूर्ण पाहयचं
म्हणून तो जरासा निजला
सगळे म्हणाले त्या घरचा नंदादीप
कायमचा विझला....

चारोळ्या

तू पुढे हात केलास
माझा हात धरायला,आणि
तेंव्हा मी निघालो होतो
माझा कडॆलोट करायला...

किती रात्री सरल्या
किती रात्री उरल्या
आणि किती त्यातल्या मी
माझ्या म्हणून धरल्या...

कुंपणाशी कुठेतरी
प्राजक्तं आणि कर्दळ
घरात मात्रं सगळीकडे
निवडूंगाची वर्दळ

तुझ्या आठवणीने मुलायम होणं
आता नेहमीचं झालय
मला वाटतं हे नवं वारं
तुझ्याकडूनच आलय...

तुझ्या आठवणीची करामत
म्हणून ही तिन्हीसांज दाटून येते
नाहीतर मला सांग,एका क्षणात
ही चांदण्यांची लाट कुठून येते....


चारोळ्या

तुला साधं
चोरून बघता येत नाही
मी म्हंटलंना तुला
शहाण्यासारखं वागता येत नाही

आकाशीच्या निळाईची
जेंव्हा ओढ लागते मनाला
मला वाटतं म्हणजे काय हे
सांगून कळणार नाही कुणाला

किनार्यावर आदळलेली लाट
पून्हा मागे वळलीच नाही
ती झिरपून गेली तिथेच
कशी ते कुणाला कळलीच नाही....

काट्याला फक्तं बोचणच माहीत
त्यात त्याचा दोष नाही
म्हणूनच माझा...
तुझ्यावर रोष नाही.

ही माझी जूनी सवय
रात्र जागून काढायची
आणि तुझ्यासाठी लिहिलेली कविता
तुला नं दाखवता फाडायची..