13 Aug 2012

ययाती - एक सुंदर कल्पना

                              त्या काव्यातली नायिका माझ्यासारखी जागीच असते. नायक मात्र निद्रावश झालेला असतो. समोरच्या खिडकीतून चंद्र बिंब दिसू लागते. नायिका आपल्या निद्रिस्त पतीकडे पाहते.त्याचा मुखचंद्र आकाशातल्या चंद्रापेक्षा सुंदर आहे असे तिला वाटते. या बाहेरच्या चंद्राची आपल्या वल्लाभाच्या मुखचंद्राला दृष्ट लागू नये म्हणून ती तो झाकून टाकू पाहते. पण आपल्या प्रियकराला तोंडावरून अगदी तलम पांघरून सुद्धा घ्यायची सवय नाही हे तिला पुरेपूर ठाऊक असते. तसले पांघरून घातले कि लगेच त्याची झोपमोड होते! म्हणून ती आपल्या नाजूक पदराने देखील त्याचे मुख झाकू इच्छित नाही, मग करायचे काय ?आकाशातल्या या मत्सरी चंद्रापासून वल्लभाचे संरक्षण कसे करायचे ? एकदम तिला एक कल्पना सुचते. त्या दिवशी तिने मोठी सुंदर केशभूषा केलेली असते. तिचे कौतुक करून नायक झोपी गेलेला असतो. आता त्या केशभूषेचातिला काही उपयोग नसतो झटकन ती ती केशभूषा विस्कटून टाकते. तिचा विपुल केशकलाप मोकळा होतो! त्या मोकळ्या केसांनी ती पतीच्या मुद्रेकडे अगदी वाकून निरखून पाहू लागते साहजिकच तिच्या प्रियकराचे मुख त्या केसांनी झाकले जाते त्याला आकाशातल्या चंद्राची दृष्ट लागण्याचा संभाव नाहीसा होतो !!

No comments:

Post a Comment