स्मशानातील सोनं - १
भीमा अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती.वर पोत्याची खोळ घेतली होती.आणि कंबर बांधलेली होती. काखेत एक अणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता.त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती.सकाळी लुगडं, एक परकर पोलका, खजूर एवढाच विचार करीत होता.आज तो बिथरला होता.
वातावरण घुमत होतं. क्षणोक्षणी गंभीर होत होतं,मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुकी देऊन पळत होतं.एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठंतरी घुबड घुत्कार करून भेसूरतेत भर घालीत होतं. त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं
कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला.त्यानं खाली बसून दूर पाहिलं.गावात सामसूम झाली होती अधून मधून कोणीतरी खाकरत होतं,एखादा दिवा डोळे मिचकावीत होता.परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी, मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला.प्रत्येक ढेपनिपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला.एका रांगेने तो नीर काढीत निघाला होता.
आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच कला झाला होता;पण एकाएकी वीज उठली होती.ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता. त्यामुळे भीमा घाबरला होता.पाऊस पडला कि, नवी गोर सापडणार नाही,याची त्याला चिंता पडली होती, म्हणून तो चपळाई करीत होता. त्याला घाम फुटला होता नि तो भान हरपला होता.
मध्यानरात्री पर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहचला आणि भयचकित होऊन मटकन बसला. वर भरभरत होता. मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या.जणू कोणीतरी दातचं खात असावं, तसं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गरगुर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं.त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला; परंतु तोच कुणीतरी हात पाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युतगतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली.आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला.
परंतु दुस-याच क्षणी त्यानं स्वतः ला सावरलं.खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःचं खजील झाला. कारण जवळचं ती नवी गोर होती.आणि दहा पंधरा कोळी जमून तिला चौफेर उकरीत होती.त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता.गोरीवरचे दगड तसेच ठेऊन दुरूनच त्यांनी घळी पडायला आरंभ केला होता. आजुबाजूनं गोर उध्वस्त करण्याचं काम ती करीत होती; परंतु पुनः त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मढ्या जवळ कोण जाणार या इर्षेनं ती एकमेकांवर गुरगुरत होती.पुनः नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्वशक्ती एकवटून माती ओढीत होती.
हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला.त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला.लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला.
अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ही चमकली.चमकली नि मुरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवाराची माती काढू लागला.
आणि त्याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पहिला. एक कोल्हा पिसाट होऊन भिमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला.अंगावरच पोतं झटकून त्यानं हातातील पहार सरळ सरळ धरली तो कोल्हा पुनः भीमावर धावला नि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला.कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्यानं कोल्हा गारद झाला. बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला नि रणधुमाळी सुरु झाली.पुनः भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. भयंकर युद्धाला आरंभ झाला.
भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते; पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरवात केली होती.
चारी बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडे तो दणका मारीत होता. कोल्हे तीरपडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पळत होते.
गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं.कुंतीपुत्र भीमाच नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्हयांशी लढत होता.उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी, आपली सर्वशक्ती पणाला लावून लढत होता.पशु आणि मानव यांचे मृतदेहासाठी दारूण रण पेटलं होतं.
सुर्ष्टी निद्रा घेत होती. मुंबई विश्रांती घेत होती.तो गाव निपचित पडला होता. आणि त्या स्मशानात सोन्यासाठी नि मढ्यासाठी झटापटिला जोर चढला होता.भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता.कोळी त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडीत होती, किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती.भीमा लचका तुटताच विवळत होता.शिव्या देत होता. शिव्या, मार, गुरगुरणे, किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते.
कितीतरी उशीराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला.अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली. आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला.आणि तो त्या गोरीत उतरला. तोच पुनः कोळी तुटून पडली नि पुनः हाणामारीला सुरवात झाली;परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली त्यांनी आपला पराजय काबुल केला.
आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं.मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताठलेलं मढ त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं.त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पहिला.एक अंगठी सापडली. कानात मुदी होती. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली कि प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली;पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्याने आपली प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली.एका बाजून ती पहार जबड्यात घालून दुसर्या बाजून त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली.सर्वांनी हुकी देऊन पळ काढला.पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला. " आरं कोळ्यांनी प्रेत खाल्लं, चला " असं कुणीतरी ओरडलं नि ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुनः डाव्याहाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पहिले आणि - बोटं काढून नंतर पहार काढण्या ऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली घटकन त्याची दोन बोटं प्रेताच्या दातात अडकली. आडकित्यात सुपारी सापडावी तशी सापडली.भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली.
आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन मानसं येत असलेली दिसली.तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताच राग आला. त्याच्याकडे येणारी मानसं पाहून तो अधिकच चिडला. त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले. आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले.त्याच्या अंगात मुंग्या उठल्या.हेच खरं भुत हे आपणाला पकडून देणार, लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील. नाही तर मारमारून पोलिसांच्या हवाली करतील. असं वाटून भीमा आगतिक झाला. वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. ' भडव्या, सोड मला.' तो जोरानं ओरडला.
गावकरी जवळ होते भीमा अडकला होता.मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती, फक्त चामाडीला चिकटून लोंबत होती.ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता.
तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरु झाली.
त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची दोन बोटं कापून काढली.
आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुनः सुरु झाल्याची बातमी आली.ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुला प्रमाणे रडू लागला.कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे