20 Feb 2018

मराठा मोर्चाच्या संयोजकांना पत्रं

औरंगाबाद मध्ये ०९ ऑगस्ट २०१६ ला पहिला मराठा मोर्चा निघाला तेव्हा मोर्चाच्या संयोजकांना लिहिलेलं हे पत्रं


आदरणीय साहेब,

सर्वप्रथम तुमचे शतश: आभार, मराठा क्रांती मोर्चा च्या निमित्ताने सकळ मराठा समाजाला एकत्र केल्याबद्दल. पत्र लिहीताना काय मायना लिहावा असा मोठा प्रश्न पडला होता, पण तुम्ही जे कार्य केलय ते आदर वाढवणारंच आहे म्हणून आदरणीय.

कालचा मोर्चा बघून उर अभिमानाने भरून आला.जन्म झाल्या पासून पहिल्यांदाच आज मी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सकळ मराठा समाज एकवटलेला बघितला. या आधीही २००४मध्ये सर्व मराठा समाजाला नोंदणी करून तसेच स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेऊनएकत्र करण्याचा प्रयत्न केला पण तो हि प्रयत्न एवढा सफल झाला नव्हता एवढा कालचा झाला. १४ एप्रिल,महावीर जयंती अशा वेळी बाहेर पडणारा इतर समाज बघितला कि वाटायचं काय आपला समाज आणि काय आपले नेते .........? पण आज तो विचार चुकीचा ठरला.

मोर्चा बघताना एक विचार प्रकर्षाने मनात डोकावला कदाचित तो प्रत्येकाच्याच मनात डोकावला असेल, तो विचार तुमच्या पर्यंत पोहोचवावा असं वाटलं. आपल्या समाजाचा हाच एकोपा जर शिवजयंतीच्या उत्सवात दिसला तर काय नजारा असेल फक्त एकदाच विचार करून बघा ..........कुठल्याच समाजाने एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या महापुरुषांची जयंती साजरी केली नसेल किंवा उत्सव साजरा केला नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण आणि फक्त आपणच करू शकतो, कारण तेवढं सामर्थ्य तेवढं माणूसबळ आपल्याकडे आहे गरज आहे ती फक्त एका आवाजाची आणि तो आवाज तुम्ही द्याचं तुम्हाला छत्रपती शिवरायांची शपथ ......

एक किस्सा सांगते - मी पैठण गेट ला राहते सकाळी जॉब ला जाण्यासाठी मला तिथून ऑटो ने स्टेशन ला जावं लागतं, जून चा दिवस - क्रांती चौकात गर्दी होती.ऑटोवाला मुसलमान होता त्याला माहित नव्हतं आज काय आहे ते, मी ओळखीची असल्याने त्याने मला विचारलं - "मॅडमजी आज कोनसा त्योहार है आप लोगों का ?" , मी मोठ्या अभिमानाने सांगितलं - "आजच्याच दिवशी माझ्या राजांचा राज्याभिषेक झाला होता", रिक्षावाला हसला म्हणाला - " दिन कितनी बार मानते हो आप ........ ?" त्या रिक्षावाल्याचे शब्द म्हणजे सणसणीत चपराक होती..

१९ फेब्रुवारीला एका मराठ्याला विचारलं महाराजांची जयंती जायचं नाही का तुला?- तर तो म्हणतो आमची जयंती पुढच्या महिन्यात आहे,आता त्यांची आहे,-अरे काय आमची आणि तुमची ज्या महाराजांची जयंती आपण साजरी करतो ते तर आपल्या सगळ्यांचेच होते मग जयंती वेगळी का ? आणि कशासाठी हि विटंबना ? लोक हसतात सर आपल्यावर हे कदाचित तुम्हालाही माहित असेल पण हे सगळं थांबायला हवं असं नाही का वाटत तुम्हाला ? सर तुम्ही फक्त एक आवाज द्या, आज सगळा समाज एका अनोळखी मुलीसाठी केवळ समाज म्हणून धावून आला मग हा तर महाराजांचा विषय आहे आणि महाराजांचं आपल्या मनातील स्थान हे देवाच्या बरोबरीत आहे. मला खात्री आहे तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल.

बघा जमतंय का ? मला माहिती आहे हे सगळं मी बोलतेय तेवढं सोपं नाही, कारण प्रत्येकजण आप आपला मी पणा धरून बसलेत, पण कुणाला तरी पुढाकार घ्यावाच लागेल कुणाला तरी कमीपणा घ्यावाच लागेल हे स्वप्न जर सत्यात उतरवायचं असेल तर….…प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.

                                                     - सौ  रोहिणी संतोष माने

No comments:

Post a Comment