17 Sept 2021

घड़ी

घड़ी घड़ी की बात है वक्त बीतता जाता है....., छूट गया जो हाथ से वो लौट कभी ना आता है.....

मुड़ गए जिस राह से वह राह पीछे रह गई..., जिस वक्त ए समझ आया तब जिंदगी की भोर हुई....

कल का अफसोस छोड़कर आज नई उमंग भरी...,घड़ी की तरह दौड़ो भागो जिंदगी है रफ्तार भरी....

8 Sept 2021

लाजाळू

उमलून येता रुप तुझे भासे पुंजक्या परी... 
पाहता तुला जणू बरसती अलगद श्रावण सरी... 

स्पर्ष होता मिटून घेसी एक एक पाकळी... 
शरमेने चंद्र लुप्त होतसे जसा रोज आभाळी....

28 Jun 2021

भाऊभेट

कसा विसावला भाऊ बहिणीच्या अंगणात
दारी वृंदावनापासीं चमेलीच्या मांडवात 

संसाराच्या रगाड्यात होतो भेटाया उशीर 
होतं हरीण काळीज गुज बोलाया अधीर 

किती बोलू किती नको काय सांगू काय ठीऊ 
गुज बोलू खंडीभर रहा मुक्कामाला भाऊ 

कवडशांच्या डोळ्यांनी डोकवाया भाऊभेट 
सूर्य धावत धावत आला माथ्यावर थेट 

बहिणीच्या पायावर भाऊ टेकवितो माथा 
शब्द देतो शब्द घेतो भेटू दिवाळीला आता 

19 Feb 2021

शहर सुटेना

शहरातल्या कॉलेज ची रंगत ही न्यारी  

मुला मुली मध्ये इथे भेद नसे तरी  

स्पर्धेमधे इथल्या अनोखी ही नशा 

शिक्षणाच्या खुल्या इथे होती दाही दिशा  

शिक्षणाची गोडी अशी सहज सुटेना 

कसं सांगू राजा मला शहर सुटेना..... 


तुझ्या माझ्या संसाराची न्यारी ती गोडी 

दोघांच्या मध्ये इथे नसे कुरघोडी 

चार खोल्यांचा फ्लॅट कसा आवरायला सोपा 

खोप्या मधी खोपा जसा सुगरणीचा खोपा 

खोलीच्या एकांताचा मोह सुटेना 

कसं सांगू राजा मला शहर सुटेना..... 


शहरातल्या रस्त्यावर धावणारी गाडी 

उंच उंच माडी आणि गोल गोल साडी 

थेटर ची मजा आणि मॉल किती भारी 

गार्डन मध्ये खेळायला जमली पोर सारी 

विकेंड च्या सहलीची हाव सुटेना 

कसं सांगू राजा मला शहर सुटेना..... 


कुंडीतलं फुल कसं  वाऱ्यासंग डोले 

खिडकीतला पाऊस तसा हळू हळू बोले 

किट्टी पार्टी ची गोड गोड मजा 

राणी च्या नजरेत विरघळणारा राजा 

पण राजाच्या मनाची घालमेल थांबेना 

कारण......,

 माझ्या राजाला अजूनही गाव सुटेना ....... !!! 




1 Jan 2021

चारोळी

भिंतीकडे तोंड केलं म्हणजे जगाकडे पाठ होत नाही....., 

याचा अर्थ इतकाच कि आपल्याला जगाला तोंड देता येत नाही.....!!!


19 Nov 2020

डॉ. अमोल कोल्हेना पत्र

 आदरणीय साहेब


पत्र लिहीताना काय मायना लिहावा असा मोठा प्रश्न पडला होतापण तुम्ही जे कार्य केलय ते आदर वाढवणारंच आहे म्हणून आदरणीयसर्वप्रथम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची ओळख आम्हाला करून दिल्या बद्दल तुमचे शतशआभार. 
खूप दिवसापासून पत्र लिहिण्याचा विचार होता पण राहून जायचं पण आज तुमचा मेल id मिळाला आणि परत एकदा तुमचे आभार मानण्याचा मनसुबा मनानी व्यक्त केला. खरंच डॉक्टर साहेब तुमचे कसे आभार कसे मानावे तेच कळतं नाही. आता तर स्वतःची लाज वाटू लागलीये कि इतका सूर्यासारखा तेजस्वी निर्मळ मनाचा माझा राजा आणि त्याच साधं चरित्र आपल्याला माहिती असू नये, छत्रपती शिवरायांवर भर भरून बोलायचो आम्ही आमचे राजे असे आमचे राजे तसे पण संभाजी महाराज त्यांच्या बद्दल काहीच माहिती नव्हतं ते शिवाजी महाराजांचे जेष्ठ पुत्र होते त्यांना औरंगजेबाने कैद करून मारलं या पलीकडे काहीच माहिती नव्हतं, मग ते मुघलांना जाऊन मिळाले दिलेर खानाकडे गेले, त्यांनी बाया नाचवल्या दारू पिले, संभाजी महाराज रंगेल होते अशा भाकड कथा ऐकायला मिळायच्या, खरा इतिहास आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न च केला नाही आम्ही, किती नालायक होतो आम्ही, आजूबाजूचे काही दरिद्री लोक माझ्या राजाची मनात येईल तशी बदनामी करत होते आणि आम्ही दळभद्र्य सारखे ऐकत होतो, पण आता तस होणार नाही कारण आता मालिका बघितलेला माझा १० वर्षाचा मुलगा पण छाती ठोकून संभाजी महाराजांबद्दल बोलतोना तेव्हा उर अभिमानानं भरून येतो हे शक्य झालं ते केवळ तुमच्यामुळे. राणूअक्कांचं तर नाव पण माहिती नव्हतं आम्हाला, शेवटी कितीही झालं तरी त्यांच्याही अंगात छत्रपतींचच रक्त त्याही तितक्याच तेजस्वी ओजस्वी, खरंच बहीण असावी तर अशी, खऱ्या अर्थाने पाठ राखण केली राणूअक्कांनी शंभूराजांची. 
अजून एक गोष्ट मालिका पूर्ण नाही बघू शकलो माफ करा शेवटचे काही भाग बघण्याची हिम्मतच झाली नाही ओ, खूप प्रयत्न केला पण नाही जमलं डोळ्या देखत माझ्या राजा वर झालेले वारं बघणं सोपं नव्हतं आणि कितीही प्रयत्न केलं;या तरी शक्य नव्हतं. 
तुमच्या अमूल्य वेळातून वेळ काढून तुम्ही माझं पत्र वाचलंत, खरे शंभू राजे कसे दिसत होते माहित नाही पण तुमच्या रूपात आम्हाला ते दिसले तुमच्यातल्या त्या शंभू राजांना एकदा प्रत्येक्ष मुजरा करण्याची मना पासून इच्छा आहे ती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा होईल पण सध्या पत्रातुनचं 

त्रिवार मानाचा मुजरा राजं......!!!   


आपलीच शिवशंभू प्रेमी 
सौ. रोहिणी संतोष माने 
औरंगाबाद 
   

19 Oct 2019

चारोळी

तुला पाहीले अन सांज मंद झाली..,
ओशाळल्या चांदण्या अन् हवा कुंद झाली..,
शुद्धीत होते आताच सारे,
तु पाहीले अन् वेळ धुंद झाली....