22 Dec 2017

लगीन गाणी

माझिया माहेरा मधे गं सई बाई गं बाई
माझ्या भावाचं लगीन लगीन लगीन लगीन
भावाच्या संगतीनं गं सई बाई गं बाई
मी कलवरी मिरवीन मिरवीन मिरवीन मिरवीन !!१!!

माझिया माहेरा मधे गं सई बाई गं बाई
दारी मांडव सजला सजला सजला सजला
हळद दळितो जात्यावरी गं सई बाई गं बाई
सूर मिळतो सुराला सुराला सुराला !!२!!

भावाच्या लग्नाला गं सई बाई गं बाई
आलं गणगोत सारं बाई सारं गं सारं बाई सारं
हातभर बांगड्या भरून गं सई बाई गं बाई
वरमाई नटल्या चार बाई चार गं चार बाई चार !!३!!

भावाच्या लग्नाची गं सई बाई गं बाई
मला हौस गं भारी बाई भारी गं भारी बाई भारी
ओव्या गाते जात्यावरी गं सई बाई गं बाई
हळदीचा थाट भारी बाई भारी गं भारी बाई भारी !!४!!
 

21 Dec 2017

लगीन गाणी

माझिया कार्याला गं सई बाई गं बाई
गणराया तुमी यावा बाई यावा गं यावा बाई यावा
मोदकाचा नैवेद्य गं सई बाई गं बाई
संगे रिद्धी सिद्धी घ्यावा बाई घ्यावा गं घ्यावा बाई घ्यावा !!१!!

माझिया कार्याला गं सई बाई गं बाई
खंडेराया तुमी यावा बाई यावा गं यावा बाई यावा
भंडाऱ्याचं बोन गं सई बाई गं बाई
संगे म्हाळसाला घ्यावा बाई घ्यावा गं घ्यावा बाई घ्यावा !!२!!

माझिया कार्याला गं सई बाई गं बाई
अंबे माता तुमी यावा बाई यावा गं यावा बाई यावा
वाघावर बैसून गं सई बाई गं बाई
दुर्गा माता तुमी यावा बाई यावा गं यावा बाई यावा !!३!!

माझिया कार्याला गं सई बाई गं बाई
विठुराया तुमी यावा बाई यावा गं यावा बाई यावा
कर कटेवरी ठेवूनिया गं सई बाई गं बाई
संग रखुमाई यावा बाई यावा गं यावा बाई यावा !!४!!

माझिया कार्याला गं सई बाई गं बाई
महादेवा तुमी यावा बाई यावा गं यावा बाई यावा
गणपतीची माता गं सई बाई गं बाई
संग पार्वती घ्यावा बाई घ्यावा गं घ्यावा बाई घ्यावा !!५!!

माझिया कार्याला गं सई बाई गं बाई
शिवराया तुमी यावा बाई यावा गं यावा बाई यावा
जिजाऊ संगे गं सई बाई गं बाई
बाळ शंभू राजे यावा बाई यावा गं यावा बाई यावा !!६!!




2 Oct 2017

आदरणीय शाळा,


आदरणीय शाळा,
हे पत्र त्या प्रत्येक शिक्षकासाठी आहे जे माझ्या लेकीला ज्ञानरूपी अमृत पाजतात, हे पत्र शाळेतल्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ( शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी ) आहे जे शाळेतल्या तासात माझ्या लेकीची काळजी घेतात, हे पत्र शाळेतल्या त्या प्रत्येक सजीव निर्जीव घटकाला आहे ज्यांच्या सहवासात माझी लेक वावरते,
हे सगळे जिथे माझ्या लेकीला भेटतात ते ठिकाण म्हणजे शाळा आणि म्हणूनच आदरणीय शाळा........ 
मुलगी झाली तेव्हा क्षणभरासाठी का होईना माझ्याही मनाची चलबिचल झाली, पण नंतर विचार केला शिवाजी राजे घडले कारण जिजाऊ जन्माला आल्या, शिवाजी तर सर्वांनाच घडवायचेत पण देवानं मला संधी दिलीय एक जिजाऊ घडवण्याची.
शाळेच्या प्रत्येक शिक्षकाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही माझ्या लेकीला असं शिक्षण द्या कि तिच्या हातून ह्या देशाची मातृभूमीची सेवा घडेल, तुम्ही कल्पना चावलाची कर्तबगारी तिच्यात भरा, स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन इतरांचे रक्षण करणाऱ्या नीरजा भनोतची कर्तव्यनिष्ठा तिला शिकवा, शहिद संतोष महाडिक यांच्या पत्नी लेफ्टनंन स्वाती महाडिक यांचं देशप्रेम तिला दाखवा, आज जगाच्या बाजारात अशी कुठलीच गोष्ट नाही जे स्त्री करू शकत नाही, ती मुलापेक्षा कमी नाही, हे तिला शिकवा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारखं तिने प्रतिभावान व्हावं, इंदिरा गांधी सारखं बाणेदार व्हावं, कधी झाशीच्या राणीसारखं लढाऊ व्हावं, तर कधी सावित्रीबाई फुले सारखं सहनशील व्हावं आणि वेळ प्रसंगी सिंधुताई सपकाळांसारखं मायाळूही व्हावं इतकीच माझी इच्छा आहे, एक दिवस असा उगवावा कि तिने मला म्हणावं

हमसे ना तू खाने की पीने की बात कर,
मर्दो की तरह दुनिया मे जीने की बात कर ......!!

खुद्द दर्द की दवा हो, औरोसे ना दवा ले,
सोफे पे मत पडे पडे पंखे कि हवा ले.....
मेहनत से बनने वाले पसीने की बात कर.....  
मर्दो की तरह दुनिया मे जीने की बात कर ......!!

जिस मातृभूमी के तू अरे गोद में पला,
जिसके पवित्र धूल में घुटनों के बल चला....
उसके फटे आंचल को तु सिने की बात कर....
मर्दो की तरह दुनिया मे जीने की बात कर ......!!
 
हे शिकवा ते शिकवा सगळं तुम्हीच शिकवा असं मी मुळीच म्हणणार नाही, माझ्या परीने मीही प्रयत्न करणारच आहे फक्त त्यात तुमचा हातभार लागावा अशी माझी इच्छा. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला माठाचा आकार देण्यासाठी फिरत्या चाकाची गरज असते तेवढीच गरज असते कुंभाराच्या हाताच्या स्पर्शाची, माझ्या लेकीला घडवण्यासाठी मी फिरत चाक व्हायला तयार आहे गरज आहे ती फक्त तुमच्या स्पर्शाची...... 
जीवनात यशस्वी होण प्रत्येकाच्याच पदरात आहे अस नाही पण प्रयत्नवादी कधी अयशस्वी होत नाही म्हणूनच .................... माझ्या लेकीला गरुडाचे पंख द्या भरारी मारण्यासाठी ,सूर्याचे तेज द्या अंधाराच्या नाशासाठी, पर्वताचा निश्चय द्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलांचा सुवास द्या दुखाःत सुद्धा हसण्यासाठी,काट्याची  धार द्या अन्यायाच्या नाशासाठी, आभाळाचे विशाल सांधे चुका माफ करण्यासाठी, वार्याचा वेग द्या  प्रगती पथावर अग्रेस होण्यासाठी आणि तुमच्याकडून शुभेच्या द्या यशस्वी होण्यासाठी ....... यशस्वी होण्यासाठी .


आपली विश्वासू
सौ  रोहिणी संतोष माने

17 Jul 2017

वो कौन था ....?

सकाळी आवरून ऑफिसला जायला निघाले, क्रांती चौकातला सिग्नल लाल वरून हिरवा झाला आणि मी माझी गाडी दामटली, पुलाखालून पुढे जाताना आकाशवाणी कडून येणारा एक ऑटो वाला डायरेक्टच पुढे आला आणि वर तोंड करून मलाच म्हणतोय ओ मॅडम बघून चालवा की, माझं डोकंच सरकलं, मग मी बोलले - " ए कुणाला शिकवतोय तू ? सिग्नल बघ आधी ...." तो त्याची चूक मान्य करायला तयारच नव्हता. मग मी तरी का माघार घ्यावी तेही माझी काहीच चूक नसताना. जवळ पास १० मिनिट आम्ही हुज्जत घालत होतो, आता बरेच लोक आजूबाजूला उभे राहून बघत होते, कुणी बघून पुढे जात होते.... तोही ऐकायला तयार नव्हता आणि मी पण, बरंच ट्रॅफिक थांबलं मग कुठून एक ट्रॅफिक पोलीस आमच्या जवळ आला आणि मला म्हणाला-
 "ओ ताई जाऊ द्याना जा तुम्ही." मी  - "अहो त्याला बोलायचं सोडून तुम्ही मला काय जायला सांगताय चूक त्याची आहे माझी नाही. " आम्ही ऐकत नाही असं पाहून तो आम्हाला म्हणाला - " तुम्ही एक काम करा दोघ, गाड्या साईडला घेऊन भांडा....."

आता आम्ही दोघ हसलो एकमेकाला टाळी दिली आणि आपआपल्या गाड्या स्टार्ट करून तिथून निघून गेलो,
आता मागे उभे असलेलं पब्लिक , तो पोलिसवाला पण तोच विचार करत होते जो आता तुम्ही करताय .........?
😃😃😃😃


वो कौन था ....?

8 Jul 2017

गुरूपौर्णिमा

" ध्यानमुलंम गुरुमूर्ती पूजा मुलंम गुरूपदंम,
मंत्रमुलंम गुरुवाक्यमं, मोक्षमुलंम गुरुकृपा ..... !!"

   आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड अधिकच आहे ते गुरूला. मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे.
   आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा. गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. महर्षी व्यास ह्यांना जगद्गुरू मानतात. त्यामुळेच कांही जण ह्या गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं ही म्हणतात. ह्या दिवशी शाळेत. मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
   नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक अशा अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.

   खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जो शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे.

    भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य घडले. तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.

       पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. 'गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?' हेच खरे आहे.
    तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आले असेल, ‘शिक्षक आपल्याला जीवनातील अनेक मूल्ये शिकवतात आणि ती कृतीत यावीत, यासाठी आवश्यक त्या वेळी शिक्षासुद्धा करतात. त्यामागे आपण आदर्श जीवन जगावे, असा त्यांचा शुद्ध हेतू असतो.’

 बोध कथा 


    प्राचीन काळाची गोष्ट. एका ऋषीच्या आश्रमात शंभर विधार्थी विद्यासंपादन करीत होते. गुरु शिकवीत होते, शिष्य शिकत होते. शिष्यांच अध्ययन संपल्यावर दीक्षांत समारंभात गुरुदक्षिणा द्यावयाची असते. शिष्यांनी गुरुवर्यांना विचारले, ' गुरुवर्य , आपण आम्हाला एवढ ज्ञान दिलत. आम्ही आपणाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो ; पण आपण त्यागी आहात, आपणाला आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय देऊआपण सांगावे.'
'शिष्यवृन्द्हो, मला अशी गुरुदक्षिणा आणा, जी जगात कोण्याच्याही उपयोगाची वस्तू नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा!'
    मग शिष्य निरुपयोगी वस्तू शोधायला निघाले. द्रव्य, वस्त्र, पात्र, धान्य यांपैकी काहीही नको, कारण या सर्वांचा उपयोगच असतो.
    एका शिष्याला एका झाडाखाली वाळलेली पाने दिसली. तो म्हणाला 'ही पाने निरुपोयोगी आहेत. तीच आपण गुरुदक्षिणा म्हणून देऊ.'
    शिष्य पाने नेऊ लागले तेवढ्यात एक शेतकरी आला. तो म्हणाला, 'कसला नेता ही पानं? ती कुजवून मी खत म्हणून वापरतो. शेताला उपयोगी पडतात.'
    शिष्य पुढे गेले. त्यांना काही वाळलेल्या काटक्या दिसल्या. त्यांची मोळी बांधून नेणार एवढ्यात काही स्त्रिया आल्या. म्हणाल्या, 'कशाला नेता ही काष्टे? ती जळणासाठी उपयोगी पडतात. त्यांवर आमचा स्वयंपाक होतो.'
शिष्य पुढे गेले. एकजण म्हणाला, 'आपण मातीच नेऊ या.'
       'अरे बाबा, माती तर सर्वात उपयुक्त आहे. मातीतूनच वृक्ष उगवतात.' मग माती आणण्याचा विचार त्यांनी रद्द केला. ते अजून पुढे जात होते. एका लहानश्या ओढ्याकाठी ते आले. त्या ओढ्याच्य प्रवाहात एका पक्ष्याच भलं मोठं पीस वाहत येताना दूरवरून त्यांनी पाहिलं. एक शिष्य म्हणाला, 'हे पिसच आपण देऊया. ते निरुपयोगी आहे. पीस जवळ आल्यावर त्यांनी पाहिलं तर त्या पिसावर काही मुंग्या होत्या. त्या म्हणाल्या, 'आमचं वारूळ फुटलं. आम्हाला पलीकडे जायचं होत. आम्ही सर्वांनी मिळून हे पीस ओढलं आणि त्यावर बसलो. ही पीस आम्हाला उपयुक्त आहे.'
    शिष्यांना समजल, कोणतीच वस्तू निरुपयोगी नाही. शिष्य निराश मानाने परतले.
गुरुवर्य म्हणाले, 'जगात कोणतीच वस्तू निरुपयोगी नाही, हे ज्ञान तुम्हाला झालं, हीच माझी गुरुदक्षिणा! जगाच्या उपयोगी पडा!'

तात्पर्य: ज्ञानाची उपयुक्तता प्रत्यक्ष कृतीत दिसली पाहिजे.