19 Feb 2021

शहर सुटेना

शहरातल्या कॉलेज ची रंगत ही न्यारी  

मुला मुली मध्ये इथे भेद नसे तरी  

स्पर्धेमधे इथल्या अनोखी ही नशा 

शिक्षणाच्या खुल्या इथे होती दाही दिशा  

शिक्षणाची गोडी अशी सहज सुटेना 

कसं सांगू राजा मला शहर सुटेना..... 


तुझ्या माझ्या संसाराची न्यारी ती गोडी 

दोघांच्या मध्ये इथे नसे कुरघोडी 

चार खोल्यांचा फ्लॅट कसा आवरायला सोपा 

खोप्या मधी खोपा जसा सुगरणीचा खोपा 

खोलीच्या एकांताचा मोह सुटेना 

कसं सांगू राजा मला शहर सुटेना..... 


शहरातल्या रस्त्यावर धावणारी गाडी 

उंच उंच माडी आणि गोल गोल साडी 

थेटर ची मजा आणि मॉल किती भारी 

गार्डन मध्ये खेळायला जमली पोर सारी 

विकेंड च्या सहलीची हाव सुटेना 

कसं सांगू राजा मला शहर सुटेना..... 


कुंडीतलं फुल कसं  वाऱ्यासंग डोले 

खिडकीतला पाऊस तसा हळू हळू बोले 

किट्टी पार्टी ची गोड गोड मजा 

राणी च्या नजरेत विरघळणारा राजा 

पण राजाच्या मनाची घालमेल थांबेना 

कारण......,

 माझ्या राजाला अजूनही गाव सुटेना ....... !!!